पुणे : पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) ताफ्यातील इलेक्ट्रिक बस सदोष असल्याने एका कंपनीला ५५ कोटी रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. सदोष ई-बसमुळे प्रवासी सेवेवर परिणाम झाल्याने संबंधित वाहने तातडीने दुरुस्त न केल्यास कंपनीला काळ्या यादीत (ब्लॅक लिस्ट) टाकण्याचा इशारा पीएमपीचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक पंकज देवरे यांनी दिला.
पीएमपी इलेक्ट्रिक आणि वातानुकूलित बस सेवा देत असून, संबंधित कंपनीमार्फत करारावर ई-बस घेण्यात आल्या आहेत. संचलनादरम्यान काही बस बंद पडत असल्याच्या तक्रारी यापूर्वी आल्या होत्या. त्या वेळी बसची दुरुस्ती करण्यात आल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले. पुन्हा या तक्रारी येऊ लागल्याने ई-बसची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये बॅटरी निकृष्ट असल्याचे समोर आले.
‘तपासणीत ४५ ई-बस बंद पडल्या असून, त्याचा वेळापत्रकावर परिणाम झाला आहे. त्यामुळे ओलेक्ट्रा ग्रीनटेक लि. या ई-बस उत्पादन कंपनीला ५५ कोटींचा दंड ठोठावण्यात आला.. तसेच, तातडीने निकृष्ट बॅटऱ्या बदलून तांत्रिक दुरुस्ती करून देण्याबाबत सूचना केल्या,’ असे पंकज देवरे यांनी स्पष्ट केले, कंपनीकडून बॅटऱ्या दुरुस्ती आणि तांत्रिक बिघाड दूर करण्याचे काम सुरू असून ५५ कोटी रुपयांचां दंड भरण्यात आला असल्याचेही देवरे यांनी नमूद केले. मात्र, वाहने पुन्हा बंद पडल्यास तांत्रिक बिघाड आढळून आल्यास या कंपनीला काळ्या यादीत (ब्लॅक लिस्ट) टाकून कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा देवरे यांनी दिला.
दरम्यान, ओलेक्ट्रा ग्रीनटेक कंपनीशी याबाबत संपर्क साधण्यात आला असता, त्यांंच्याकडून प्रतिसाद देण्यात आला नसला, तरी संबंधित कंपनीकडून ५५ कोटी रुपयांचा दंड पीएमपी प्रशासनाकडे भरण्यात आला आहे.