शिवप्रतिष्ठान संघटनेचे अध्यक्ष संभाजी भिडे वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत आहेत. एका महिला पत्रकाराने कुकू लावलं नसल्याने संभाजी भिडे यांनी तिच्याशी बोलण्यास नकार दिला. “तू आधी कुंकू लाव, मग मी तुझ्याशी बोलतो” असं विधान त्यांनी केलं असून यानंतर त्यांच्यावर सर्व स्तरातून टीका होत आहे. याच पार्श्वभूमीवर पुण्यात संभाजी भिडेंविरोधात काँग्रेस महिला आघाडीकडून आंदोलन करण्यात आलं.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

संभाजी भिडेनी मुंबईत महिला पत्रकाराबद्दल केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ राज्यभरात अनेक ठिकाणी पडसाद उमटत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर आज पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिर चौकात काँग्रेस पक्षाच्या महिला पदाधिकाऱ्यांकडून टिकली न लावता आंदोलन करण्यात आलं. यावेळी संभाजी भिडेंच्या फोटोला महिलांनी टिकली लावून निषेध नोंदविला.

‘परंपरेच्या बाजारात अक्कल…’, संभाजी भिडेंच्या ‘कुंकू लाव’ विधानावर सुप्रिया सुळेंची टीका, फेसबुकवर शेअर केली पोस्ट

महाराष्ट्र काँग्रेस कमिटीच्या उपाध्यक्षा, माजी नगरसेविका संगीता तिवारी यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. यावेळी बोलताना त्यांनी संभाजी भिडेंवर जोरदार टीका केली. “तुम्ही आधी घरातून सुरु करा, नंतर पत्रकारांना सांगा. तुमच्या सुनबाई अमृता फडणवीस तुमच्यासमोर तशाच येतात ना. त्या तर महाराष्ट्राच्या वहिनी आहेत, मग त्यांनीही कुंकू टिकली लावली पाहिजे. आधी घरातून सुरुवात करा,” अशी टीका त्यांनी केली.

“आधी कुंकू लाव, मगच तुझ्याशी बोलतो”, महिला पत्रकाराशी बोलताना संभाजी भिडेंचं वादग्रस्त विधान; म्हणाले “भारतमाता विधवा…”

“आम्हाला शिकवणारे तुम्ही कोण? संविधानाने आम्हाला कसं राहायचं, काय घालायचं याचा हक्क दिला आहे. उद्या तुम्ही जीन्स, टी-शर्ट घालू नका, डोक्यावर पदर घ्या असं सांगाल. हा काय तालिबान आहे का? हा भारत देश असून शाहू, फुले, आंबेडकर यांच्या विचाराने चालतो. बायकांनी कुंकू लावायचं की नाही हे ठरवणारे तुम्ही कोण?,” अशी विचारणा संगीता तिवारी यांनी यावेळी केली.

“तुम्ही भारतामाता धर्मांध केली आहे, आमची भारतमाता सर्वांना सामावून घेणारी आहे. तुमच्यासारख्या माथेफिरु, धर्मवेड्यांनी भारतमातेचं नाव खराब केलं आहे. आम्ही मात्र ते होऊ देणार नाही. आम्ही तुम्हाला कोणत्या ब्रँडचं धोतर घालावं सांगितलेलं नाही,” अशी टीका त्यांनी केली.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pune congress protest against sambhaji bhide over controversial statement on woman without bindi svk 88sgy