पुणे : कागदपत्रांची फाईल गहाळ झाल्याचे तक्रारदाराकडून दीड हजार रुपयांची लाच घेणाऱ्या जिल्हा ग्राहक तक्रार निवार आयोगातील लिपिकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) पकडले. नवीन प्रशासकीय इमारतीच्या आवारातील एका उपाहारगृहाजवळ ही कारवाई करण्यात आली. याप्रकरणी लिपिकाविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

योगेश दत्तात्रय चवंडके (वय ३७) असे गु्न्हा दाखल करण्यात आलेल्याचे नाव आहे. याबाबत एकाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती. तक्रारदाराचा २०२२ मध्ये अपघात झाला होता. नुकसान भरपाई मिळवण्यासाठी तक्रारदाराने नवीन प्रशासकीय इमारतीत असलेल्या ग्राहक तक्रार निवारण आयोगात दाद मागितली होती.

विमा कंपनीने नुकसान भरपाई देण्यास टाळाटाळ केल्याने तक्रारदाराने दावा दाखल केला होता. दाव्यावरील सुनावणीस गेल्या तारखेला तक्रारदार ग्राहक आयोगात उपस्थित राहिले. तेव्हा दाखल केलेल्या दाव्याची फाईल गहाळ झाल्याचे लिपिक चवंडके याने त्यांना सांगितले होते.

संबधित फाईल शोधून पटलावर ठेवण्यासाठी चवंडकेेने तक्रारदाराकडे दोन हजार रुपयांची लाच मागितली होती. त्यानंतर तक्रारदाराने दीड हजारांची लाच देण्याचे मान्य करुन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती. त्यानंतर मंगळवारी (१ जुलै) चवंडकेने तक्रारदारांशी संपर्क साधला. गहाळ झालेली फाईल मिळाली असल्याचे सांगितले. मंगळवारी दुपारी नवीन प्रशासकीय इमारतीच्या आवारातील उपाहारगृहाजवळ तक्रारदाराला बोलाविले.

त्याच्याकडून दीड हजारांची लाच घेणाऱ्या चवंडके याला सापळा लावून पकडण्यात आले. याप्रकरणी रात्री उशीरा चवंडकेविरुद्ध गु्न्हा दाखल करण्यात आला. पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अतिरिक्त अधीक्षक डाॅ. शीतल जानवे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. पोलीस निरीक्षक प्रवीण निंबाळकर तपास करत आहेत.

खरेदीखताची प्रत देण्यासाठी पाच हजारांची लाच

खरेदीखताची प्रत देण्यासाठी पाच हजारांची लाच घेणाऱ्या दुय्यम निबंधक हवेली कार्यालयाच्या आवारात एका महिलेला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पकडले. छत्रपती शिवाजी रस्त्यावरील तहसीलदार कचेरीच्या आवारात ही कारवाई करण्यात आली. याप्रकरणी अनिता विनोद रणपिसे (वय ५४, रा. जेजुरी जकातनाका, सासवड) हिच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत एकाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती.

रणपिसे हे तहसीलदार कचेरीच्या आवरात टंकलेखनाचे काम करते. तक्रारदाराला घर तारण ठेवून कर्ज काढणार होते. त्यासाठी खरेदीखताची प्रत मिळवण्यासाठी ते तहसीलदार कार्यालयात आले होते. आवारात टंकलेखनाचे काम करणारी रणपिसे ही प्रत मिळवून देण्यासाठी सहा हजारांची लाच मागितली. तडजोडीत पाच हजारांची लाच देण्याचे मान्य करुन तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली. त्यानंतर मंगळवारी तक्रारदाराकडून लाच घेताना रणपिसेला पकडण्यात आले. पोलीस उपअधीक्षक भारती मोरे तपास करत आहेत.