पुणे : कोंढवा परिसरात घरफोडी करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला शहर गुन्हे अन्वेषण विभागाने गजाआड केले. त्याच्याकडून पाच गुन्हे उघडकीस आले असून एक लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.   अमीर अजमाईन खान (वय २०, रा. कोंढवा) हे संशयित आरोपीचे नाव आहे. गुन्हे शाखेच्या युनिट पाचचे पथक कोंढवा परिसरात गस्त घालत असताना अमीर याच्याकडे चोरीचे सोने असल्याची माहिती मिळाली.

त्यानुसार,सापळा रचून या पथकाने त्याला  ताब्यात घेतले. त्याच्याकडे कसून चौकशी केली असता त्याने कोंढवा परिसरात घरफोडी केल्याची कबुली दिली. त्याच्याकडून घरफोडीचे पाच गुन्हे उघडकीस आले असून एक लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने, रोख रक्कम आणि मोबाईल जप्त करण्यात आला आहे.  पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, सहायक पोलीस निरीक्षक कृष्णा बाबर, पोलीस उपनिरीक्षक चैताली गपाट आणि पथकाने ही कारवाई केली.