पुणे : ‘डेटिंग ॲप’वरील ओळखीतून तरुणाला कोयत्याचा धाक दाखवून त्याच्याकडील ६० हजारांची रोकड लुटून नेण्यात आल्याची घटना मंगळवार पेठेत घडली. तरुणाला धमकावून त्याच्या खात्यातून ६० हजार रुपयांची रोकड आरोपीने बळजबरीने काढून घेतली. याप्रकरणी फरासखाना पोलिसांनी एकाला अटक केली.
याप्रकरणी वाहिद रज्जाक शेख (वय १९, रा. रेल्वे भराव वस्ती, जुना बाजार, मंगळवार पेठ) याला अटक करण्यात आली. याबाबत एका तरुणाने फरासखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार तरुण नारायण पेठेत राहायला आहे. ‘डेटिंग ॲप’वरुन त्याची शेख याच्याशी ओळख झाली होती. मंगळवारी (९ जून) सायंकाळी साडेसहाच्या सुमारास आराेपी शेख आणि साथीदारांनी त्याला मंगळवार पेठेतील भराव वस्ती परिसरात बोलावून घेतले. रेल्वेच्या जागेत तरुणाला कोयत्याचा धाक दाखविला. त्याच्या खात्यातून ऑनलाइन पद्धतीने ६० हजार रुपये आरोपी शेख आणि साथीदारांनी काढून घेतले. या घटनेनंतर घाबरलेल्या तरुणाने फरासखाना पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली.
पोलिसांनी तातडीने तपास करून शेख याला पकडले. त्याच्याबरोबर असलेल्या साथीदारांचा शोध घेण्यात येत आहे. सहायक पोलीस निरीक्षक शीतल जाधव तपास करत आहेत. काही महिन्यांपूर्वी शहरात ‘डेटिंग ॲप’च्या माध्यमातून झालेल्या ओळखीतून चौघांना लुटण्यात आल्याच्या घटना घडल्या होत्या.