कोथरूड भागातील प्राप्ती भोसले यांचे पती काही वर्षांपासून आजारी होते. पतीच्या नावे असलेल्या आयुर्विमा पॉलिसीत गुंतवणूक करा, अन्यथा आयकर खात्याच्या कारवाईला सामोरे जावे लागेल, गुंतवणूक केल्यास एक कोटी ३८ लाख परताव्यापोटी मिळवून देतो, अशी बतावणी त्यांच्याकडे दोघे-तिघे जण करत होते. भोसले यांनी त्यांच्यावर विश्वास ठेवला पण प्रत्यक्षात तीन वर्षांत भोसले यांच्याकडून त्यांनी तब्ब्ल ७२ लाख रुपये उकळले. अखेर फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर भोसले यांनी पोलिसांकडे तक्रार देण्याचा निर्णय घेतला. त्यांनी सायबर गुन्हे शाखेकडे तक्रार दिली. त्यानंतर सायबर गुन्हे शाखेकडून या गुन्ह्य़ाचा चिकाटीने तपास करण्यात आला. पोलिसांचे प्रयत्न आणि तक्रारदार महिलेच्या पाठपुराव्यामुळे चोरटय़ांना नवी मुंबईत पकडण्यात पोलिसांना यश आले. अटक करण्यात आलेल्या चोरटय़ांमध्ये एका महिलेचाही समावेश आहे.

फसवणुकीचा हा प्रकार कशा घडला याबाबत सायबर गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील पवार यांनी सांगितले, की भोसले यांचे पती एका खासगी कंपनीत नोकरीत आहेत. मात्र, गेल्या काही वर्षांपासून ते आजारी आहेत. पतीच्या नावे रिलायन्स लाइफ इन्शुरन्स आणि आयसीआयसीआय प्रुडेन्शीअल लाइफ इन्शुरन्स पॉलिसी या आयुर्विमा पॉलिसी आहेत. डिसेंबर २०१४ मध्ये त्यांच्याशी निखिल सुतार याने संपर्क साधला होता. पॉलिसीमध्ये काही रक्कम तत्काळ भरावी लागेल. त्यामुळे पॉलिसीत गुंतवलेल्या रकमेत वाढ होईल, अशी बतावणी त्याने भोसले यांच्याकडे केली. भोसले यांनी तातडीने काही रक्कम निखिल याने सांगितलेल्या बँक खात्यात भरली. त्यानंतर साक्षी गोएंका हिने पुन्हा भोसले यांच्याशी संपर्क साधला. तिने भोसले यांच्याकडून पॉलिसीची माहिती घेतली. इन्शुरन्स रेग्युलटरी डिरेक्टिव्ह ऑफ इंडियाच्या सूचनेनुसार आणखी काही रक्कम भरावी लागेल, अन्यथा आयकर खात्याचे अधिकारी घरी येऊन तपासणी करतील, अशी बतावणी तिने केली होती. तुमची पॉलिसी बंद पडेल, असेही तिने सांगितले होते. त्यामुळे भोसले घाबरल्या. तुमच्या घरी आमच्या कंपनीतील एक जण येईल, त्याच्याकडे रक्कम भरा, असे तिने सांगितले. पती आजारी असल्यामुळे आणखी काही त्रास नको, म्हणून घाबरलेल्या भोसले यांनी त्वरित पैशांची जमवाजमव केली आणि घरी आलेल्या दीपक नावाच्या व्यक्तीकडे काही रक्कम दिली.

डिसेंबर २०१४ ते फेब्रुवारी २०१७ याकालवधीत रोख स्वरूपात तसेच बँक खात्यात भोसले यांनी जवळपास ७२ लाख एक हजार ९९९ रुपये भरले. त्यानंतरही त्यांच्याकडे पैशांची मागणी करण्यात आली होती. त्यामुळे त्यांना संशय आला. खातरजमा केल्यानंतर आपण फसवले गेल्याची जाणीव त्यांना झाली. त्यामुळे त्यांनी कोथरूड पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदवली. सायबर गुन्हे शाखेकडून या गुन्ह्य़ाचा समांतर तपास सुरू करण्यात आला. पोलिसांनी भोसले यांना धीर दिला. तांत्रिक तपास सुरू करताना बँक खात्याची पडताळणी करण्यात आली. त्यानंतर या प्रकरणातील आरोपींचा माग काढण्यास सहायक निरीक्षक स्वप्नाली शिंदे-बोऱ्हाडे यांनी सुरुवात केली. भोसले यांच्या घरी प्रत्येक वेळी पैसे घेण्यासाठी वेगवेगळ्या व्यक्ती येत होत्या. त्यामुळे चोरटय़ांचा माग काढण्यात काही अडचणी येत होत्या. पोलिसांनी भोसले यांना तपासकामी मदत करण्याची विनंती केली. तुम्ही पुढाकार घेतल्यास चोरटय़ांना पकडू, अशा विश्वास निर्माण केला. त्यानंतर साक्षी गोएंका हिने पुन्हा त्यांच्याकडे तीन लाख साठ हजार रुपयांची मागणी केली. तेव्हा मी नवी मुंबईत येणार आहे. प्रत्यक्ष भेटून पैसे देते, असे त्यांनी गोएंका हिला सांगितले. त्यानुसार सायबर गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षक मनीषा झेंडे आणि पथकाने नवी मुंबईत सापळा लावला. भोसले यांच्याकडून पैसे घेणाऱ्या गोएंका हिला पकडण्यात आले. तिची चौकशी करण्यात आली. तेव्हा तिचा साथीदार निखिल सुतार याचा ठावठिकाणा लागला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. पोलिसांनी भोसले यांची फसवणूक केल्याप्रकरणी साक्षी गोएंका ऊर्फ नेहा चौधरी ऊर्फ प्रियांका विठ्ठल रोकडे (वय २५, रा. शिवम हाउसिंग सोसायटी, ऐरोली, नवी मुंबई) आणि तिचा साथीदार दीपक ऊर्फ निखिल सुतार ऊर्फ अभिषेक अशोक घोसाळकर (वय २८, रा. आनंदनगर सोसायटी, रघुनाथनगर, ठाणे) यांना अटक केली आहे. तपासात असे दिसून आले, की हे आरोपी मुंबईतील एका खासगी कंपनीत काम करत होते. विमा पॉलिसीसंदर्भात येणाऱ्या शंकाचे निरसन करण्याचे काम या कंपनीकडून त्यांना सोपवण्यात आले होते. आरोपी साक्षी हिला विमा पॉलिसीधारकांची नावे, पत्ते आणि मोबाइल क्रमांक माहीत होते. या माहितीचा गैरवापर करून तिने साथीदार आरोपी दीपक याच्याशी संगनमत करून फसवणूक केली. मात्र अखेर त्यांनी केलेला गुन्हा उघडकीस आला.

या गुन्ह्य़ाचा छडा लावण्यासाठी पोलीस उपायुक्त दीपक साकोरे यांनी सूचना दिल्या होत्या. त्यांनी केलेल्या मार्गदर्शनानुसार पोलीस निरीक्षक सुनील पवार, मनीषा झेंडे, सहायक निरीक्षक स्वप्नाली शिंदे, उपनिरीक्षक प्रवीण स्वामी, नितीन खामगळ, राजू भिसे, राजकुमार जाबा, दीपक भोसले, अमित अवचरे, शिरीष गावडे, नवनाथ जाधव, विजय पाटील, अस्लम अत्तार, सरिता वेताळ यांनी तपासकामी महत्त्वाची भूमिका बजावली.

अशा प्रकारे संबंधितांनी आणखी काही जणांची फसवणूक केल्याचा संशय पोलिसांना आहे. त्या दृष्टीने पोलिसांकडून तपास सुरू आहे.

  • पॉलिसीबाबत अशी खबरदारी घ्या
  • पॉलिसीची माहिती अनोळखी व्यक्तीला देऊ नका
  • पैशांची मागणी झाल्यास त्वरित संबंधित कंपनीशी संपर्क साधा
  • अनोळखी बँक खात्यात पॉलिसीची रक्कम भरू नका
  • फसवणुकीचा संशय आल्यास त्वरित पोलिसांकडे तक्रार द्या