पिंपरी : जुन्या भांडणाच्या कारणावरून आठ जणांच्या टोळक्याने एका व्यक्तीवर कोयत्याने वार करत खुनी हल्ला केला. घरांवर दगडफेक आणि वाहनांची तोडफोड केली. ही घटना शनिवारी (१२ जुलै) रात्री ओटास्किम, निगडी येथे घडली. पोलिसांनी तिघांना अटक केली आहे.
साहिल गुलाब शेख (२२, निगडी), शंतनू सुनील म्हसुडगे (२४, रावेत), अविनाश भाऊ आव्हाड (२६, किवळे) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांच्या पाच साथीदारांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी २३ वर्षीय महिलेने निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका आरोपीचे फिर्यादी महिलेचे पती आणि सोहेल जाधव यांच्यासोबत पूर्वी भांडण झाले होते. त्या रागातून आरोपींनी फिर्यादी यांच्या वडिलांवर कोयत्याने वार केले. फिर्यादी यांच्या घरावर दगड मारले. एकालाही जिवंत सोडणार नाही, अशी धमकी देत हवेत कोयते नाचवून दहशत निर्माण केली. फिर्यादी यांच्या मैत्रिणीच्या घरावर दगडे मारून तिच्या दुचाकीसह अन्य चार दुचाकींची तोडफोड करीत नुकसान केले.
शस्त्र बाळगल्याप्रकरणी भोसरीत दोघांना अटक
शस्त्र बाळगल्याप्रकरणी गुंडा विरोधी पथकाने दोघांना अटक केली. ही कारवाई रविवारी (१३ जुलै) सायंकाळी देवकर वस्ती भोसरी येथे करण्यात आली.
अजय सुखदेव माने (२५, भोसरी), सोमनाथ अंकुश पवार (२९, लोहगाव) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी पोलीस शिपाई विजय तेलेवार यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, देवकर वस्ती भोसरी येथील देवकर यांच्या मोकळ्या जागेत दोघेजण शस्त्र घेऊन आले असल्याची माहिती गुंडा विरोधी पथकाला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा लावून अजय आणि सोमनाथ या दोघांना ताब्यात घेतले. अजयकडून एक पिस्तूल आणि एक जिवंत काडतूस तर सोमनाथकडून एक कोयता अशी शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत.
शस्त्र बाळगल्या प्रकरणी बावधनमध्ये दोघांवर गुन्हा
बेकायदेशीरपणे शस्त्र बाळगल्या प्रकरणी बावधन पोलिसांनी दोन तरुणांवर गुन्हा दाखल केला. ही कारवाई रविवारी (१३ जुलै) करण्यात आली.
याप्रकरणी पोलीस हवालदार बंडू मारणे यांनी बावधन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बावधन पोलीस ठाण्याच्या हद्दीत भुगाव रोड येथे एका दुचाकीवरून दोघेजण संशयीत रीत्या जात असताना पोलिसांना आढळले. दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे एक कोयता आढळून आला. पोलिसांनी दुचाकी आणि कोयता जप्त करत दोघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
भोसरी एमआयडीसीत गॅस रिफिलिंग प्रकरणी एकास अटक
अवैधरित्या गॅस रिफील केल्याप्रकरणी एमआयडीसी भोसरी पोलिसांनी एका तरुणाला अटक केली. ही कारवाई रविवारी (१३जुलै) सकाळी खंडे वस्ती भोसरी येथे करण्यात आली.
लोकेंद्र ख्मान सिंग (२५, चिखली) असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस शिपाई भाऊसाहेब गायकवाड यांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खंडे वस्ती भोसरी येथे एका इमारतीच्या वाहनतळामध्ये लोकेंद्र हा बेकायदेशीरपणे मोठ्या सिलेंडर मधून लहान सिलेंडर मध्ये गॅस भरीत होता. ग्राहकांना विक्री करण्यासाठी टेम्पोतून आणलेल्या घरगुती वापराच्या सिलेंडर मधून चोरी केली जात होती. दरम्यान लोकेंद्र याने गॅस भरताना कोणतीही सुरक्षेची काळजी घेतली नाही. याबाबत माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी कारवाई करत लोकेंद्र याला अटक केली आहे.