पुणे : ‘देशातील सहा हजार धरणांपैकी अनेक धरणांचे आयुर्मान शंभरीपार गेले असून, या धरणांना बदलत्या हवामानाचा फटका बसत आहे. तीन धरणांचे पुरामुळे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे देशातील धरणांच्या सुरक्षिततेबाबत राष्ट्रीय आव्हान निर्माण झाले आहे,’ असे मत राष्ट्रीय धरण सुरक्षा प्राधिकरणाचे (नॅशनल डॅम सेफ्टी ॲथोरिटी – एनएसडीए) अध्यक्ष अनिल जैन यांनी गुरुवारी पुण्यात व्यक्त केले.

‘या नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी धरणांची नियमित सुरक्षितता, बदलत्या हवामानानुसार वेळापत्रक, धोक्यापूर्वी अचूक इशारा देणारी प्रणाली, आधुनिक तंत्रज्ञानानुसार धरणांची पुनर्बांधणी, मजबुतीकरण याबाबतचे प्रगत संशोधन केंद्रीय जल आणि वीज संशोधन केंद्रातर्फे (सीडब्ल्यूपीआरएस) सुरू आहे,’ असेही ते म्हणाले.

‘सीडब्ल्यूपीआरएस’ आणि ‘इंडियन जिओटेक्निकल सोसायटी’ (आयजीएस) पुणे यांच्या वतीने ‘सीडब्ल्यूपीआरएस’च्या ‘जुन्या आणि अडचणीत आलेल्या जलविद्युत प्रकल्पांचे व्यवस्थापन : आव्हाने आणि संधी’ या विषयावरील राष्ट्रीय चर्चासत्राचे उद्घाटन गुरुवारी (११ सप्टेंबर) जैन यांच्या उपस्थितीत झाले. ‘पुढील शतकासाठी भारताच्या धरणांचे संरक्षण’ या पुस्तकांचे प्रकाशन यावेळी झाले. दोन दिवसांच्या या प्रदर्शनात दीडशेहून अधिक प्रतिनिधींना भाग घेतला होता.

अवकाळी पाऊस, कधी अतिवृष्टी, तर कधी दुष्काळ यामुळे धरणांच्या गुणवत्तेच्या आणि सुरक्षिततेच्या प्रश्नांकडे लक्ष वेधताना जैन म्हणाले, ‘हा राष्ट्रीय संपत्तीला धोक्याचा इशारा आहे. नैसर्गिक बदलामुळे जमीन खचते. भूस्खलनामुळे नद्यांना पूर येत असून, उत्तराखंड आणि पंजाबमध्ये सुरू असणारी अतिवृष्टी हे त्याचेच उदाहरण आहे. त्यासाठी सातत्यपूर्ण संशोधनाशिवाय जलसंपदेचे संरक्षण करता येणार नाही. विशेषतः हिमालयीन पट्ट्यातील भूकंप जोखीम, गाळ व्यवस्थापन यांसारख्या नव्या आव्हानांवर उपाय शोधण्यासाठी प्रयत्न व्हावेत.’

डॉ. बालन यांचे मार्गदर्शन

यावेळी केंद्राचे अतिरिक्त संचालक डॉ. एम. सेल्वा बालन यांनी धरणांच्या व्यवस्थापनासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि उपकरणे यावर मार्गदर्शन केले. शास्त्रज्ञ हनुमंतप्पा यांनी जुन्या आणि संकटग्रस्त जलविद्युत प्रकल्प व्यवस्थापन नियोजन आणि त्यावर पडणारा ताण या विषयावर माहिती दिली. डॉ. मंदिरा मुजुमदार यांनी भूभौतिकीय तपासाच्या आधाराने धरणाच्या पायाचा शोध या विषयावर मार्गदर्शन केले. डॉ. प्रकाश पले यांनी एनडीटीद्वारे जुन्या धरणांचे सुरक्षितता मूल्यांकन या विषयावर, तर धरण गळतीमध्ये झिरपण्याच्या क्षेत्रांचे निर्धारण करण्यासाठी मूळच्या अभियांत्रिकी गुणधर्मांचे मूल्यांकन या भूभौतिक पद्धतींचा वापर या विषयावर डॉ. रोलँड यांनी उपस्थितांना माहिती दिली.

धरण हे केवळ जलसाठ्याचे भांडार नसून, ते कृषी, उद्योग, वीजनिर्मिती आणि लोकजीवनाचा आधार आहे. धरणांची सुरक्षा राष्ट्रीय सुरक्षेशी निगडित आहे. हिमालयीन प्रदेशातील भूकंपापासून सुरक्षितता, गाळ व्यवस्थापन, हिमनदी फुटीचा अभ्यास आणि अत्याधुनिक निरीक्षण प्रणाली ही भविष्यातील मुख्य प्राधान्ये असून, विविध पातळीवर संशोधन करण्यात येत आहे. – डाॅ. प्रभातचंद्र, संचालक, सीडब्ल्यूपीआरएस