पुणे : महाराजा सयाजीराव गायकवाड सारथी गुणवंत मुला-मुलींना परदेशात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत राज्यातील ४४ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे. मात्र, गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा निवड झालेल्या विद्यार्थ्यांच्या संख्येत घट झाल्याचे दिसून येत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

राज्य शासनाच्या नियोजन विभागाने परदेशात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत निवड झालेल्या विद्यार्थ्यांची यादी शासन निर्णयाद्वारे जाहीर केली. महाराजा सयाजीराव गायकवाड सारथी गुणवंत मुला-मुलींना परदेशात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती योजना २०२३-२४पासून लागू करण्यात आली. पदव्युत्तर पदवी आणि पदविका, पीएच.डी. अभ्यासक्रमासाठी अनुक्रमे ५० आणि २५ विद्यार्थ्यांची निवड करण्यात येते. राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे अंतिम निवड यादी जाहीर होणे रखडले होते. छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण आणि मानव विकास संस्थेच्या अध्यक्षांच्या अध्यक्षतेखालील समितीने या योजनेअंतर्गत आलेल्या अर्जांची छाननी केली. त्यात एकूण ४४ विद्यार्थी पात्र ठरले आहेत.

हेही वाचा…पुण्यात ‘या’ रस्त्यावरून क्षमतेपेक्षा जास्त वाहनांचा प्रवास, प्रवाशांसाठी का ठरतोय जीवघेणा?

योजनेमध्ये करण्यात आलेली निवड गृह विभागाच्या चौकशीच्या अधीन राहून मंजूर करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांनी अर्जात चुकीची माहिती सादर केल्याचे चौकशीत आढळून आल्यास शिष्यवृत्ती रद्द करण्यात येईल, पुढील शिक्षणासाठी अटकाव करण्यात येईल, तसेच झालेल्या खर्चाची रक्कम १५ टक्के चक्रवाढ व्याजाने वसूल करून संबंधित विद्यार्थ्याला काळ्या यादीत टाकण्यासह प्रचलित कायद्यानुसार कारवाई येईल. शिष्यवृत्ती मंजूर केलेल्या विद्यार्थ्यांनी त्यांचे शिक्षण संपल्यानंतर राज्याची सेवा करणे, त्यांच्या ज्ञानाचा उपयोग राज्याला करून देण्याचे बंधपत्र द्यावे लागेल, असे नमूद करण्यात आले आहे.

स्टुडंट्स हेल्पिंग हँडचे कुलदीप आंबेकर यांनी या योजनेच्या प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. योजनेअंतर्गत ७५ जागा असतानाही गेल्या वर्षी ५० विद्यार्थी, तर यंदा ४४ विद्यार्थ्यांचीच निवड करण्यात आली. तसेच अर्ज प्रक्रियेनंतर पाच महिन्यांनी निवड यादी जाहीर झाली आहे. या दिरंगाईचा परिणाम विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक योजनांवर आणि आर्थिक नियोजनावर होतो. त्यामुळे योजनेची प्रक्रिया वेळेत पूर्ण होणे आवश्यक आहे. तसेच योजनेसाठी असलेल्या सर्व जागांवर विद्यार्थी निवड झाली पाहिजे. या योजनेची परिपूर्ण अंमलबजावणी होणे गरजेचे आहे, असे त्यांनी सांगितले.

हेही वाचा…पुणे : सतीश वाघ खून प्रकरणात आणखी एकाला अटक

दोन विद्यार्थी पीएच.डी.चे, ४२ विद्यार्थी पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे निवड झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये पीएच.डी. अभ्यासक्रमासाठी दोन, पदव्युत्तर पदवी-पदविका अभ्यासक्रमासाठी ४२ विद्यार्थी आहेत. ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, अमेरिका अशा देशांतील विद्यापीठांतील अभियांत्रिकी, व्यवस्थापन, विज्ञान, विधी, अर्थशास्त्र आणि वाणिज्य, कला, वास्तुकला या विद्याशाखांतील अभ्यासक्रम विद्यार्थ्यांनी निवडले आहेत.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pune forty four students selected for maharaja sayajirao gaekwad sarathi scholarship abroad pune print news ccp 14 sud 02