पुणे : ‘पुणे ग्रँड चॅलेंज टूर’ सायकल स्पर्धेची तारीख निश्चित करण्यात आली आहे. ही स्पर्धा येत्या १९ ते २३ जानेवारी या कालावधीत होणार आहे. दरम्यान, स्पर्धेसाठीचे रस्ते, आरोग्य व्यवस्था आदी पायाभूत सुविधा आणि सुरक्षितता या बाबी आंतरराष्ट्रीय स्पर्धेच्या निकषानुसार आणि दर्जेदार तयार कराव्यात, अशी सूचना विभागीय आयुक्त डाॅ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी केली.
पुणे ग्रँड चॅलेंज टूर सायकल स्पर्धेसंदर्भात विभागीय आयुक्त कार्यालयात आढावा बैठक झाली. पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे आयुक्त डॉ. योगेश म्हसे, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीपसिंग गिल या वेळी उपस्थित होते.
‘पुणे ग्रँड चॅलेंज टूर ही आंतरराष्ट्रीय स्पर्धा पुण्यात प्रथमच होत असून, स्पर्धा देशासाठी अत्यंत महत्त्वाची आणि प्रतिष्ठेची आहे. तिच्या आयोजनासाठी दर १५ दिवसांनी बैठक घेऊन कामकाजाच्या प्रगतीचा आढावा घेण्यात येणार आहे. भविष्यात ऑलिम्पिक स्पर्धा भरविण्याच्या दृष्टीने ही स्पर्धा महत्त्वाची आहे,’ असे डाॅ. पुलकुंडवार यांनी सांगितले.
ते म्हणाले, ‘स्पर्धेसाठीचे रस्ते आंतरराष्ट्रीय सायकलिंग असोसिएशनच्या (यूसीआय) मानकांनुसार तयार करण्यात येतील. सार्वजनिक बांधकाम विभाग, पुणे महानगरपालिका, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका यांनी या रस्त्यांची कामे करून घेताना एकसमानता राहील, याकडे लक्ष द्यावे. त्रयस्थ संस्था नेमून केलेल्या कामांचे वेळोवेळी परीक्षण करण्यात येईल. रस्त्यांची कामे येत्या आठवड्यापासून हाती घेण्यात येणार आहेत.
सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडिया (सीएफआय) यांनी स्पर्धेच्या मार्गावरील अपघात होऊ शकतात, अशी ठिकाणे निश्चित करून दिली असून, तेथे आवश्यक त्या उपाययोजना पोलीस, तसेच संबंधित विभागांनी कराव्यात. स्पर्धा मार्गावरील शासकीय रुग्णालये अद्ययावत करावीत, तसेच जवळची खासगी रुग्णालये अत्यावश्यक सुविधेसाठी निश्चित करावीत, अशी सूचनाही डाॅ. पुलकुंडवार यांनी केली.
‘स्पर्धेला आंतरराष्ट्रीय सायकलिंग असोसिएशनची मान्यता मिळाली आहे. त्यांच्या संकेतस्थळावरील दैनंदिनीमध्ये या स्पर्धेची नोंद घेण्यात आली आहे. आतापर्यंत ६ ते ७ देशांनी सहभाग नोंदविण्याच्या दृष्टीने संपर्क केला असून, सुमारे ५० देश सहभागी होण्याची अपेक्षा आहे,’ असे जिल्हाधिकारी डुडी यांनी स्पष्ट केले.