पुणे : ‘हरे राम, हरे कृष्णा’च्या जयघोषात ओडिशामधील पुरी येथील जगन्नाथ रथयात्रेच्या धर्तीवर कृष्णभावनामृत संघ म्हणजेच इस्कॉन पुणेच्या वतीने रथयात्रा काढण्यात आली. ‘इस्कॉन’च्या मंदिरातील जगन्नाथ, बलराम आणि सुभद्रा यांची मूर्ती रथामध्ये सजवण्यात आल्या होत्या. मोठ्या उत्साहात पुष्पवृष्टी करून, ठिकठिकाणी रांगोळ्या रेखाटत पुणेकरांनी या रथयात्रेचे स्वागत केले.
टिळक रस्त्यावरील सर परशुराम भाऊ महाविद्यालयातून ‘जगन्नाथ रथयात्रा सोहळ्या’ला सुरुवात झाली. केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, मत्स्य आणि बंदर विकासमंत्री नीतेश राणे, आमदार हेमंत रासने, भीमराव तापकीर, योगेश टिळेकर, सुनील कांबळे, ‘इस्कॉन संस्थे’चे लोकनाथ स्वामी आदी यावेळी उपस्थित होते.
केरळमधील थैय्यम लोककलेवर आधारित महाविष्णू, नृसिंह सरस्वती या देवतांच्या रूपातील कलाकारांचे नृत्यरथ यात्रेत आकर्षणाचे केंद्र होते. हरे कृष्ण महामंत्राचे कीर्तन आणि त्यावर भावविभोर होऊन भक्त भगवान जगन्नाथाच्या रथासमोर नृत्य करीत होते. भक्तीच्या वातावरणात मोठ्या उत्साहाने हजारो भाविक जगन्नाथाचा रथ ओढत होते. सर परशुराम भाऊ महाविद्यालय, अभिनव महाविद्यालय चौक, बाजीराव रस्ता, शनिपार चौक, नगरकर तालीम चौक, लक्ष्मी रस्ता, शगुन चौक, रमणबाग शाळा, ओंकारेश्वर मंदिर, बालगंधर्व रंगमंदिर, जंगली महाराज रस्ता, खंडुजीबाबा चौक, टिळक चौक, टिळक रस्ता यामार्गे पुन्हा सर परशुराम भाऊ महाविद्यालय असा प्रवास करून रथयात्रेचा समारोप झाला. रथाच्या मार्गावरील प्लास्टिकच्या बाटल्या, कचरा उचलून स्वयंसेवक स्वच्छता करीत होते.