Pune Ballr Pub Protest: एकीकडे भारत-पाकिस्तान सामन्याला मोठ्या प्रमाणावर विरोध होत असताना रविवारी पुण्यात पाकिस्तानी कलाकार समजून भलत्याच व्यक्तीविरोधात आंदोलन झाल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी १४ आंदोलकांना मध्यरात्रीच्या सुमारास ताब्यात घेतलं आहे. पाकिस्तानला असणारा विरोध व्यक्त करण्यासाठी एका संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आंदोलनाचा मार्ग स्वीकारला खरा, पण पोलिसांनी मध्यस्थी केल्यानंतर संबंधित कलाकार पाकिस्तानी नसल्याची बाब स्पष्ट झाली. यावेळी गोंधळ घालणाऱ्या आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं.

नेमकं काय घडलं?

हा सगळा प्रकार रविवारी रात्री पुण्याच्या कल्याणी नगर परिसरातील ‘बॉलर’ नावाच्या पबमध्ये घडला. या पबमध्ये रविवारी संध्याकाळी नेदरलँडचे नागरिक असणारे इम्रान नासिर खान यांच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. कार्यक्रमाच्या काही वेळ आधी इम्रान नासिर खान हे पाकिस्तानी कलाकार असल्याची आवई सोशल मीडियावर उठली. एकीकडे पहलगाम हल्ला व ऑपरेशन सिंदूरच्या पार्श्वभूमीवर भारत-पाकिस्तान सामन्याला मोठा विरोध पाहायला मिळाल्यानंतर पुण्याच्या पबमध्ये पाकिस्तानी कलाकाराच्या कार्यक्रमाचं आयोजन होत असल्याचा राग आल्यामुळे आंदोलक रात्रीच्या सुमारास मोठ्या संख्येनं या पबच्या बाहेर जमा झाले.

पाकिस्तानी कलाकारांच्या कार्यक्रमाला तीव्र विरोध असल्याची भूमिका मांडच आंदोलकांनी पबच्या बाहेर गोंधळ घालायला सुरुवात केली. यासंदर्भात येरवडा पोलीस स्थानकातील पोलीस निरीक्षक रवींद्र शेळके यांनी सविस्तर माहिती दिली आहे. “सोशल मीडियावरची माहिती वाचून एका संघटनेचे कार्यकर्ते ‘बॉलर’ पबच्या बाहेर जमा झाले आणि आंदोलन करू लागले. त्यांना संबंधित कलाकाराची खरी ओळख सांगितल्यानंतरदेखील हे आंदोलक पबमध्ये जाणाऱ्या नागरिकांना आत जाण्यापासून रोखत होते”, असं शेळके म्हणाले.

“घटनास्थळावर कायदा व सुव्यवस्थेची कोणतीही समस्या उद्भवू नये, म्हणून आम्ही त्यातील १४ आंदोलकांना ताब्यात घेतलं. यानंतर सदर ठिकाणी पोलिसांची पुरेशी कुमक तैनात करण्यात आली व परिस्थिती लागलीच नियंत्रणात आणली गेली”, अशी माहिती शेळके यांनी दिली.

विरोधाच्या पार्श्वभूमीवर भारत-पाकिस्तान सामना

दरम्यान, पहलगाम दहशतवादी हल्ला व ऑपरेशन सिंदूरच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानशी क्रिकेट खेळण्यास तीव्र विरोध पाहायला मिळाला. आशिया कप २०२५ मध्ये रविवारी झालेल्या सामन्यात भारतानं पाकिस्तानला ७ गडी राखून नमवलं. मात्र, भारतानं हा सामनाच खेळायला नको होता, अशी भूमिका सामन्याआधी महाराष्ट्रातील ठाकरे गटासह अनेकांनी व्यक्त केली होती. त्यासाठी महाराष्ट्रात ठिकठिकाणी आंदोलनही करण्यात आलं. या विरोधामुळे तणावपूर्ण झालेल्या वातावरणात रविवारी रात्री भारत-पाकिस्तान सामना पार पडला.