पुणे : कात्रज येथील राजीव गांधी प्राणी संग्रहालयामध्ये हरिणवर्गीय वन्यप्राण्यांच्या नैसर्गिकरीत्या गळून पडलेली शिंगे वन विभागातर्फे नियमानुसार मंगळवारी नष्ट करण्यात आली. वन्यजीव संरक्षण कायद्याअंतर्गत वन्यजीवांच्या नैसर्गिक अवशेष विल्हेवाटीसंदर्भात दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार उपवनसंरक्षक विभागातर्फे ही कार्यवाही करण्यात आली.
प्राणी संग्रहालयातील सांबर, चितळ आणि भेकर या हरिणवर्गीय प्रजातींच्या एकूण १७६ गळालेल्या शिंगांचे संकलन करण्यात आले होते. या शिंगांची प्राणी संग्रहालयातील ज्वलनशील वायू आधारित दाहिनीमध्ये नियमानुसार विल्हेवाट लावण्यात आली. या संपूर्ण प्रक्रियेचा पंचनामा, व्हिडीओ रेकॉर्डिंग, तसेच आवश्यक दस्तऐवजीकरण करण्यात आले आहे.
या कार्यवाहीसाठी स्वतंत्र समिती गठीत करण्यात आली होती. वन्यप्राण्यांचे नैसर्गिक अवशेष योग्य पद्धतीने आणि कायद्यानुसार नष्ट करणे गरजेचे आहे, अशी माहिती उपवनसंरक्षक (वन्यजीव) तुषार चव्हाण यांनी दिली.
राजीव गांधी प्राणिसंग्रहालयामध्ये मंगळवारी सकाळी झालेल्या या कार्यवाहीच्या वेळी तुषार चव्हाण यांच्यासह सहायक वनसंरक्षक मंगेश ताटे, वन परिक्षेत्र अधिकारी सुरेश वरक, संग्रहालयाचे संचालक डॉ. राजकुमार जाधव, मानद वन्यजीव रक्षक आदित्य परांजपे, वनपाल, मंडल अधिकारी उपस्थित होते.