पुणे : आधार केंद्र वितरणात पुणे जिल्ह्याने राज्यात आघाडी घेतली असून, रिक्त १२२ केंद्रांसाठी कालबद्ध कार्यक्रम राबवून या केंद्रांना आधार संच वितरणाची कार्यवाही पूर्ण करण्यात आली आहे. माहिती आणि तंत्रज्ञान विभागाकडून जिल्ह्यासाठी २०३ आधार संच प्राप्त झाले होते. त्याअनुषंगाने रिक्त केंद्रांसाठी आधार संच राबविण्याची प्रक्रिया जिल्हाधिकारी कार्यालयाकडून राबविण्यात आली होती.

जिल्ह्यातील ग्रामीण भागांतील प्रत्येक महसूल मंडळ, नगर पालिका, पुणे महानगरपालिका आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रात वाढती लोकसंख्या विचारात घेता तसेच शहरी भागात लोकांचे होणारे स्थलांतर विचारात घेता आधार केंद्रांची मोठी आवश्यकता होती. त्यानुसार जिल्हा स्तरावर आधार केंद्र वितरणाबाबतचा कालबद्ध कार्यक्रम निश्चित करण्यात आला होता.

ग्रामीण कार्यक्षेत्राकरिता ६५ महसूल मंडळ, नगर पालिकेकरिता ७, पुणे महापालिकेसाठी २२ तर पिंपरी-चिंचवड महापालिकेसाठी २८ रिक्त केंद्र अशा एकूण १२२ रिक्त आधार केंद्रांसाठी जाहीरात प्रसिद्ध करण्यात आली होती, अशी माहिती उपजिल्हाधिकारी पल्लवी घाटगे यांनी दिली.

अर्जदाराकडे ‘आपले सरकार’ सेवा केंद्र असणे, शासकीय जागेचे ‘ना हरकत’ प्रमाणपत्र असणे, अर्हता पात्र पर्यवेक्षक असणे इत्यादी अटी निश्चित करण्यात आल्या होत्या. पात्र अर्जदारांमधून जिल्हाधिकारी कार्यालयात १२ जून रोजी सोडतीद्वारे (लकी ड्रॉ) सर्व अर्जदारांसमक्ष अंतिम अर्जदारांची निवड करण्यात आली.

जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत यापूर्वी वितरण झालेले आधार संच जुने झालेले असल्याने त्यांना नवीन आधार संच बदलून देण्याबाबत शासनाची मार्गदर्शक सूचना प्राप्त झालेली आहे. त्यानुसार जिल्हास्तरावरुन कार्यवाही सुरू आहे. अंतिम पात्र ठरलेल्या आपले सरकार सेवा केंद्र धारकांना नुकतेच धान्य गोदाम वडकी येथे आधार संचांचे वितरण करण्यात आल्याचे घाटगे यांनी सांगितले.

आधार संच वितरणाची प्रक्रिया ही खुल्या जाहिरात देऊन राबविल्याने माझ्यासारख्या गरजू व्यक्तीला न्याय मिळाला. लॉटरीद्वारे अर्जदारांची निवड केल्याने आधार संच वितरणाबाबत कोणतीही शंका राहिली नाही. – रूपाली कुमावत, पिंपरी-चिचंवड केंद्र चालक

वेल्हे (राजगड) सारख्या दुर्गम भागात आधारच्या कामासाठी नागरिकांना ४० ते ५० किलोमीटर लांब जावे लागत होते. वेल्हे तालुक्यातील बारा मावळ खोरे, वेल्हे, कानंद पासली, पानशेत या दुर्गम भागातील वृद्ध, महिला, विद्यार्थी यांना फायदा होणार आहे. – संदीप कांबळे आंबवणे मंडळ, वेल्हे