पिंपरी : वाहतूक कोंडी सोडवत असताना ‘वाद का करत आहात’ असे म्हटल्याने एकाने वाहतूक मदतनीस ( ट्राफिक वॉर्डन) शिवीगाळ करून मारहाण केली. त्याला जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना चिंचवड येथील महावीर चौकात घडली.

या प्रकरणी वाहतूक मदतनीसाने पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार एका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि त्यांचे सहकारी हे महावीर चौक येथे कर्तव्यावर असताना वाहतूक कोंडी झाली होती. वाहतूक काढत असताना एका बसमधील कंपनीचा कर्मचारी खाली उतरला. पुढे असलेल्या एका मोटारीच्या चालकाशी बाचाबाची करत होता. फिर्यादीने त्यांच्याजवळ जाऊन ‘वाद का करत आहात’ असे विचारले असता आरोपीने त्यांना शिवीगाळ केली. तसेच, हाताने धक्काबुक्की करत कॉलर पकडून मारहाण केली. आरोपीने बाजूला पडलेला सिमेंटचा गट्टू फिर्यादीच्या डोक्यात मारल्याने त्यांना दुखापत झाली आणि आरोपीने जीवे मारण्याची धमकी देऊन तेथून पळ काढला. पिंपरी पोलीस तपास करत आहेत.

चिखलीत कंपनीमधून दीड लाखांच्या साहित्याची चोरी

चिखली येथील एका कंपनीच्या प्रवेशद्वाराचे कुलूप तोडून चोरट्यांनी दीड लाख रुपये किमतीच्या अॅल्युमिनियमच्या प्लेट्स चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे.या प्रकरणी संदिपकुमार महावीरप्रसाद बाजिया (३४, चिखली) यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार मुकेश विजय सिंग (२८, सोणवणे वस्ती, चिखली), बिटु कुमार सुरेश (२०, सोणवणे वस्ती, चिखली), नसिम अब्दुल करिम साह (२०), समिउल्ला साह फैजुलउल्ला साह (२६), मोहम्मद नसिम नुरमहम्मद साह (२३, मुळशी) यांना अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या कंपनीच्या प्रवेशद्वाराचे कुलूप तोडले. चोरट्याने कंपनीमध्ये प्रवेश केला. चोरट्यांनी कंपनीतून एकूण एक लाख ५३ हजार ९९० रुपये किमतीच्या अॅल्युमिनियमच्या प्लेट्स चोरून नेल्या. या चोरीच्या प्रकरणात चिखली पोलिसांनी आरोपींना अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.तळेगावातील वराळेत तरुणावर चाकूने वार जुन्या भांडणाच्या कारणावरून तिघांनी मिळून एका तरुणावर चाकूने वार केल्याची घटना तळेगाव दाभाडे एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वराळे येथे घडली.

याप्रकरणी २१ वर्षीय तरुणाने तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जुन्या भांडणाच्या कारणावरून आरोपींनी फिर्यादीला पकडून जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने चाकूने डोक्यात वार केला. फिर्यादीने तो वार चुकवल्याने तो डाव्या गालावर बसला आणि त्यांना दुखापत झाली. आरोपींनी फिर्यादीला शिवीगाळ करत जीवे ठार मारण्याची धमकी दिली. तळेगाव एमआयडीसी पोलीस तपास करत आहेत.

मारुंजीत जागा खरेदी विक्री प्रकरणात अडीच कोटींची फसवणूक एका महिलेकडून घेतलेल्या जमिनीची बनावट कागदपत्रे तयार करून परस्पर दुसऱ्या लोकांना विक्री करून २ कोटी ४० लाख रुपयांची फसवणूक केल्याची घटना मुळशीतील मारुंजी येथे घडली.या प्रकरणी एका महिलेने हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि त्यांच्या भावाने मारुंजी येथील सहा गुंठे जागा तिघांकडून कुलमुखत्यार पत्र आणि साठेखताने लिहून घेतली होती. मात्र आरोपींनी ही जागा परस्पर दुसऱ्या लोकांना बनावट कागदपत्रे बनवून विक्री केली. या व्यवहारात फिर्यादी महिलेची दोन कोटी ४० लाखांची फसवणूक झाली. हिंजवडी पोलीस तपास करत आहेत.

चिखलीत मोटारीच्या धडकेत वृद्धाचा मृत्यू भरधाव वेगातील मोटारीची धडक बसल्याने डोक्यास व छातीस गंभीर दुखापत झाल्यामुळे वृद्धाचा मृत्यू झाला. ही घटना चिखली येथील नेवाळेवस्ती येथे घडली.नवनाथ रामचंद्र गंभीरे (६५) असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. या प्रकरणी निलेश नवनाथ गंभीरे (३३, नेवाळेवस्ती, चिखली) यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार मोटार चालका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीचे वडील नवनाथ गंभीरे हे रस्त्याने पायी चालत जात होते. त्यावेळी भरधाव मोटारीने फिर्यादीच्या वडिलांना पाठीमागून धडक दिली. या धडकेत त्यांच्या डोक्यास व छातीस गंभीर दुखापत होऊन त्यांचा मृत्यू झाला. धडक दिल्यानंतर चालक वाहन न थांबवता निघून गेला. चिखली पोलीस तपास करत आहेत.भरधाव रिक्षाच्या धडकेत नागरिकांना दुखापतएका रिक्षाचालकाने आपल्या ताब्यातील रिक्षा वाहतुकीच्या नियमांकडे दुर्लक्ष करून बेदरकारपणे व हयगयीने चालवल्यामुळे रस्त्याने जाणारे नागरिक जखमी झाले. ही घटना हिंजवडीत घडली.

या प्रकरणी २१ वर्षीय तरुणाने हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार रिक्षाचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रिक्षाचालक आरोपीने रिक्षा बेदरकारपणे व हयगयीने चालवली. तसेच, वाहतुकीच्या नियमांकडे दुर्लक्ष केले. यामुळे स्वतःला आणि इतरांच्या जीविताला धोका निर्माण होईल अशा पद्धतीने रिक्षा चालवून फिर्यादी आणि इतर लोकांना जखमी केले. हिंजवडी पोलीस तपास करत आहेत.