पुणे : शास्त्रीय संगीतातील बंदिश, भक्तिगीत, भावगीत, नाट्यपद, गज़ल, चित्रपटगीत अशा वैविध्यपूर्ण गीतांची मालिका ‘लोकसत्ता’च्या वतीने आयोजित ‘चांदणस्वर’ मैफलीद्वारे शुक्रवारी स्वरमंचावरून सादर होत असताना माणिक वर्मा यांच्या लडिवाळ स्वरांचे रसिकांना पिसे लागले. माणिक वर्मा यांना जन्मशताब्दीनिमित्त स्वरांजली अर्पण करून अभिवादन करणाऱ्या या कार्यक्रमाला रसिकांचा उदंड प्रतिसाद लाभला.
ज्येष्ठ गायिका माणिक वर्मा यांच्या गीतांची ‘चांदणस्वर’ ही मैफल ‘लोकसत्ता’च्या वतीने आयोजित करण्यात आली होती. कार्यक्रमाची नियोजित वेळ सायंकाळी सहा असली, तरी साडेपाच वाजल्यापासूनच पुणेकर रसिकांच्या गर्दीने टिळक स्मारक मंदिराचे प्रांगण फुलून गेले होते. माणिक वर्मा यांच्याकडून गायनाची तालीम लाभलेल्या ज्येष्ठ गायिका शैला दातार, मंजूषा पाटील, मुग्धा वैशंपायन, सावनी दातार-कुलकर्णी आणि मृण्मयी फाटक यांनी माणिकबाईंची अजरामर गीते सादर करून ‘चांदणस्वर’ मैफलीमध्ये अनोखे रंग भरले. प्रसिद्ध अभिनेत्री ऐश्वर्या नारकर यांच्या निरूपणातून माणिक वर्मा यांच्या गायकीच्या वैशिष्ट्यांसह त्यांच्या जीवनातील महत्त्वाच्या प्रसंगांवर प्रकाश टाकला गेला. पु. ल. देशपांडे यांनी ‘मैत्र’मध्ये माणिक वर्मा यांच्याविषयी केलेल्या लेखाचे प्रसिद्ध अभिनेते अविनाश नारकर यांनी अभिवाचन केले. मिती क्रिएशन्सच्या उत्तरा मोने यांनी कार्यक्रमाची निर्मिती आणि संहितालेखन केले होते.
‘हसले मनी चांदणे’ या मंजूषा पाटील यांनी गायलेल्या गीताने ‘चांदणस्वर’ कार्यक्रमाची सुरुवात झाली. मुग्धा वैशंपायन यांनी गायलेल्या ‘कबिराचे विणतो शेले कौसल्येचा राम बाई’ या गीतानंतर ‘गोकुळीचा राजा माझा’ हे गीत मृण्मयी फाटक यांनी सादर केले. ‘घननीळा लडिवाळा’ या माणिक वर्मा यांच्या आवाजातील गीताची दृश्यफीत पाहताना रसिकांनी स्वरांच्या हिंदोळ्यावर झुलण्याची प्रचिती घेतली. ‘त्या सावळ्या तनूचे मज लागले पिसे गं’, ‘सख्या रे किती रंगला खेळ’, ‘खरा तो प्रेमा’, ‘बलसागर तुम्ही वीर शिरोमणी’, ‘विजयपताका श्रीरामाची झळकते अंबरी’ ही गीते सादर झाली. या कलाकारांना केदार भागवत (संवादिनी), प्रसाद जोशी (तबला), सौरभ शिर्के (पखवाज), केदार परांजपे (सिंथेसायझर), प्रणव हरिदास (बासरी) आणि चेतन परब (तालवाद्य) यांनी साथसंगत केली.
‘सावळाच रंग तुझा’ या गीताच्या सादरीकरणानंतर शैला दातार यांनी आपल्या मनोगतातून माणिक वर्मा यांच्या आठवणींना उजाळा दिला. ‘सांगू कशी गं मनाची व्यथा ही’ आणि ‘त्या चित्तचोरट्याला का आपुले म्हणू मी’ या गज़लच्या अंगाने जाणाऱ्या दोन गीतांनंतर शैला दातार यांनी ‘तुझ्या मनात कुणी तरी लपलं गं’ हे अजरामर गीत सादर केले. गानसरस्वती किशोरी आमोणकर यांनी मामिक वर्मा यांच्या आठवणी जागविणारी दृष्यफीत पाहताना रसिकही त्या मंतरलेल्या चैत्रबनात हरवून गेेले. ‘जाळीमंदी पिकली करवंद’ या माणिक वर्मा यांच्या लोकप्रिय लावणीनंतर शैला दातार यांनी सावनी दातार-कुलकर्णी यांच्यासमवेत ‘जौनपुरी’ रागातील बंदिश सादर केली. मंजूषा कुलकर्णी यांनी ‘अमृताहूनी गोड नाम तुझे देवा’ ही भक्तिरचना सादर केली. ‘अकेली मत जईयो राधे जमुना के तीर’ या भैरवीने कार्यक्रमाची सांगता झाली तेव्हा रसिकांनी उभे राहून टाळ्यांचा कडकडाट करत कलाकारांना अभिवादन केले.
मुख्य प्रायोजक : विलास जावडेकर डेव्हलपर्स
सहप्रायोजक : लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, पिनॅकल ग्रुप, पु. ना. गाडगीळ ज्वेलर्स आणि चाफळकर करंदीकर डेव्हलपर्स
पॉवर्ड बाय : सिटी प्राइड, केजेस् एज्युकेशनल इन्स्टिट्यूट ट्रिनिटी कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग आणि मांडके हिअरिंग सर्व्हिसेस