Pune DPDC Meeting Updates: पुण्यातलं ट्रॅफिक अर्थात वाहतूक खोळंबा हा नेहमीच चर्चेचा विषय ठरला आहे. पुणेकरांना या वाहतूक खोळंब्यामुळे मोठ्या मनस्तापाचा सामना करावा लागतो. पण रस्त्यांवर होणारी गर्दी कमी करण्यासाठी पुण्यातल्या वाहतूक खोळंब्यावर उपाय म्हणून आता पुणेकरांसाठी तब्ब २७६ किलोमीटर लांबीचे नवे मेट्रो मार्ग प्रस्तावित करण्यात आले आहेत. यामध्ये पुणे, पिंपरी-चिंचवड आणि आसपासच्या ठिकाणांना जोडणाऱ्या मेट्रो मार्गिकांचा समावेश आहे. पुणे शहरासह जिल्ह्यातील वाहतूक व्यवस्थेवर दीर्घकालीन उपाययोजना करण्यासाठी गुरुवारी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत पुढच्या ३० वर्षांसाठीचा आराखडा सादर करण्यात आला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

गुरुवारी झालेल्या बैठकीत सादर झालेल्या या सर्वंकष योजनांचा एकूण खर्च तब्बल १ लाख २६ हजार ४८९ कोटींच्या घरात जाईल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. पुढील तीस वर्षांत हा खर्च तीन टप्प्यांमध्ये केला जाणार असून त्यानुसार योजना राबवल्या जातील, असं इंडियन एक्स्प्रेसनं दिलेल्या सविस्तर वृत्तात नमूद करण्यात आलं आहे. या नियोजनामध्ये पुण्यातील एकूण २० हजार ५५० चौरस मीटरचा परिसर मेट्रोच्या नव्या मार्गिकांनी जोडला जाणार आहे. २७६ किलोमीटर लांबीच्या या नव्या मार्गिका असतील. त्याशिवाय, पुढच्या तीन दशकांमध्ये पुण्यात एकूण सहा नवे बीआरटी कॉरिडॉर तयार करण्यात येणार आहेत.

नव्या प्रस्तावित मेट्रो मार्गिका…

१. वनात ते चांदणी चौक
२. रामवाडी ते वाघोली
३. जिल्हा न्यायालय ते येवलेवाडी
४. विद्यापीठ चौक ते देहू रोड
५. खराडी ते खडकवासला
६. निगडी ते चाकण
७. हडपसर ते सासवड रोड
८. हडपसर ते लोणी काळभोर
९. जिल्हा न्यायालय ते आळंदी
१०. वाकड चौक ते शेवलेवाडी

या दहा मार्हिकांमध्ये प्रत्यक्ष पुणे शहरातच फिरणाऱ्या मार्गिकांसोबतच पुण्यातील मेट्रो स्थानकांना पुणे शहराबाहेरील ठिकाणांशी जोडणाऱ्या मार्गिकांचाही समावेश आहे. या सर्व मार्गिकांची मिळून लांबी २७६ किलोमीटर आहे. यातील वनाज ते चांदणी चौक आणि रामवाडी ते वाघोली मेट्रो मार्गिकांचा प्रस्ताव मंजुरीसाठी केंद्र सरकारकडे पाठवण्यात आला आहे.

पीएमपीएमएलसाटठी ६ हजार नव्या बसेस

दरम्यान, मेट्रोप्रमाणेच शहरांतर्गत वाहतूक व्यवस्थेत सुधारणा करण्यासाठी पीएमपीएमएलसाठी नव्या बसेसचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. सध्या पीएमपीएमएल फक्त १० टक्के प्रवाशांना वाहतुकीची व्यवस्था पुरवते. हे प्रमाण ६० टक्क्यांपर्यंत नेण्याचं प्रशासनाचं नियोजन आहे. त्यासाठी पीएमपीएमएलसाठी ६ हजार नव्या बसेसची आवश्यकता असेल. त्यात १६२५ इलेक्ट्रिक बसेसचाही समावेश आहे. त्यामुळे पुढील ३० वर्षांत म्हणजेच २०५४ पर्यंत पुण्यातील बसेसची संख्या ११ हजार ५६४ पर्यंत पोहोचेल. याशिवाय, या प्रस्तावात नवे ६४१ बस मार्ग, १८ अतिरिक्त करिडॉर आणि २० नव्या बस स्थानकांचा समावेश आहे.

सहा नव्या बीआरटी मार्गांचा प्रस्ताव

यासह पीएमआरडीएकडून सहा नव्या बीआरटी मार्गिकांचा प्रस्ताव सादर करण्यात आला आह.यामध्ये रावेत ते राजगुरूनगर, गवळी माथा चौक ते शेवलेवाडी, रावेत ते तळेगाव दाभाडे, चांदणी चौक ते हिंजेवाडी, लोणी काळभोर ते कडेगाव आणि भुमकर चौक ते चिंचवड चौक या मार्गांचा समावेश आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pune metro routs pmpml bus count dpdc meeting proposed comprehensive mobility plan pmw