महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अस्तित्व जाणवू लागले, की समजायचे कोणत्या तरी निवडणुका जवळ आल्या. निवडणूक आल्यावर आक्रमक होणारा हा पक्ष पुण्यात मागील पाच वर्षांपासून निद्रिस्तावस्थेत असल्यासारखा होता. आता ‘हिंदुत्व आणि मराठी माणसासाठी लढा’ असा पक्षश्रेष्ठींचा आदेश आल्याने मनसैनिक जागे झाले आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा मराठीचे स्मरण करत या पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मराठी माणसासाठी लढ्याला तयार झाल्याचे आश्वासक चित्र पुण्यात सध्या तरी निर्माण झाले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांनंतर नेहमीप्रमाणे मनसे शांत होती. आता अचानक आंदोेलनाचा पवित्रा घेतला आहे. त्यामुळे महापालिका निवडणुका जवळ आल्याची चाहूल लागली आहे. या वेळी ‘हिंंदुत्व आणि मराठी माणूस’ हा विषय घेऊन आक्रमक भूमिका घेण्याचा आदेश पक्षश्रेष्ठींकडून देण्यात आल्याने मनसेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते कामाला लागले आहेत. त्याची सुरुवात ‘मनसे आपल्या दारी’ या अभियानाने करण्यात आली आहे. पुणे शहरातील नागरी प्रश्नांचा आढावा घेण्यासाठी मनसेचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी नागरिकांच्या दारी जाऊन त्यांचे प्रश्न सोडविण्यास सुरुवात केली आहे. ‘प्रश्न जेथे जनतेचा, मार्ग तेथे मनसेचा’ हे ब्रीदवाक्य घेऊन या अभियानाद्वारे पुणेकरांशी संपर्क साधण्याचे नियोजन करण्यात आले आहे. ही एक चांगली बाब म्हणावी लागेल. पाच वर्षांनी का होईना मनसे नागरिकांच्या दारी जाऊन समस्या सोडविण्यासाठी मदतीचा हात पुढे करत आहे, हेही नसे थोडके. महापालिका निवडणुकांना लांबणीवर पडल्या असल्या, तरी या अभियानाच्या निमित्ताने पुन्हा सुखावह काळ येण्यासाठी मनसेची ही पायाभरणी साहाय्यभूत ठरणार आहे.

‘हिंदुत्व आणि मराठी माणूस’ या मुद्द्यांना प्राधान्य देण्याच्या पक्षश्रेष्ठींच्या आदेशानुसार मनसेचे पदाधिकारी हे आता कृती करू लागले आहेत. हडपसरमधील एक मंदिर पाडण्याच्या तयारीत महापालिका असल्याचे समजल्यावर त्याविरुद्ध शहराध्यक्ष साईनाथ बाबर यांच्या नेतृत्वाखाली महापालिकाभवनात आंदोलन छेडण्यात आले. मंदिर पाडणार नसल्याचे आश्वासन महापालिका प्रशासनाकडून घेण्यात आले आहे. एका इंग्रजी शाळेतील प्रवेशाचा प्रश्नही उपस्थित करून मराठी मुलांना प्रवेश मिळण्यासाठी आग्रह मनसेने धरला आहे.

मनसेची महाराष्ट्र नवनिर्माण जनाधिकार सेनाही मराठीच्या मुद्द्यावरून आक्रमक झाली आहे. बँक ऑफ महाराष्ट्र या बँकेच्या शाखांतून आवश्यक सेवा ही मराठी भाषेतून देण्याची आणि खातेदारांशी संवाद साधताना बँकेतील कर्मचाऱ्यांनी मराठी भाषेचा वापर करण्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण जनाधिकार सेनेची आहे. मनसेचे प्रदेश सरचिटणीस हेमंत संभूस यांच्या नेतृत्वाखाली या आंदोलन करण्यात आले. दिल्ली येथे होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या सोहळ्यासाठी जाणाऱ्या मराठी साहित्यिक आणि रसिकांना रेल्वे मंत्रालयाने सवलत देण्यास नकार दिला आहे. हा प्रश्नही उचलून धरण्यात आला आहे. रेल्वे मंत्रालयाने ही सवलत न दिल्यास आंदोलन करण्याचाही इशाराही संभूस यांनी दिला आहे.

महापालिका निवडणुकांपूर्वी पूर्वीसारखे दिवस येण्यासाठी हीच वेळ असल्याची जाणीव पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना झाली असल्याने मराठी माणसाच्या हक्कांसाठी पुण्यात मनसे पुन्हा सक्रिय झाल्याचे दिसून येत आहे.

पुण्यात मनसेची ताकद होती. मात्र, ती हळूहळू क्षीण होत गेलेली दिसते. २००७ मध्ये पहिल्यांदा या पक्षाने महापालिका निवडणुकीमध्ये सहभाग घेतला. तेव्हा पहिल्याच प्रयत्नात आठ नगरसेवक निवडून आले होते. २०१२ च्या निवडणुकीत अनपेक्षित यश या पक्षाला मिळाले होते. २९ नगरसेवक निवडून आल्याने पुण्यात या पक्षाची चलती होती. मात्र, त्यानंतर पक्षबांधणीचा अभाव आणि पक्षांतर्गत गटबाजीमुळे या पक्षाची वाताहत झाली. २०१७ मध्ये २९ पैकी २७ जणांना पराभूत व्हावे लागले. अवघ्या दोन नगरसेवकांपुरती मनसे मर्यादित राहिली. त्यानंतर अनेक जुन्या पदाधिकाऱ्यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली. त्यानंतरही पक्षात निष्ठेने राहिलेल्या पदाधिकाऱ्यांना बळ न मिळाल्याने हा पक्ष क्षीण होत गेला. निवडणुका लढविण्याबाबतची धरसोड वृत्तीही कारणीभूत ठरली. एखाद्या निवडणुकीत उमेदवार उभा करायचा, तर दुसऱ्या निवडणुकीत कोणत्या तरी पक्षाला पाठिंंबा देत तटस्थ राहायचे, ही भूमिका मनसेला आत्मघातकी ठरत आली आहे.

आता पुन्हा नव्या जोमाने मनसेने काम सुरू केले आहे. फक्त हा उत्साह महापालिका निवडणुकीपर्यंत कायम राहणार, की नेहमीप्रमाणे निद्रिस्तावस्था येणार, हे येत्या काही दिवसांतच पक्षाच्या पाठिराख्यांना दिसेल. sujit. tambade @expressindia. com

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pune mns office bearers and activists became active during elections time pune print news spt 17 sud 02