पुणे : शिवाजीनगर न्यायालयाच्या समोर मोटारीत असलेल्या महिलेचा मोबाइल संच दुचाकीस्वार चोरट्यांनी हिसकावून नेल्याची घटना घडली. याबाबत एका महिलेने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार महिला मूळच्या नवी मुंबईतील आहेत. न्यायालयीन कामकाजासाठी त्या पुण्यात आल्या. शिवाजीनगर न्यायालयातील प्रवेशद्वार क्रमांक तीनसमोर त्या मोटारीत बसल्या होत्या. त्या वेळी दुचाकीस्वार चोरटे मोटारीजवळ आले. चोरट्यांनी महिलेच्या हातातील १५ हजारांचा मोबाइल संच हिसकावून नेला. पोलीस उपनिरीक्षक प्रताप साळवे तपास करत आहेत. शहरात गेल्या काही महिन्यांपासून नागरिकांकडील मोबाइल संच हिसकावणाऱ्या चोरट्यांनी उच्छाद मांडला. शहरात दररोज मोबाइल हिसकावण्याच्या किमान दोन ते तीन घटना घडतात.