पुणे : वारज्यात बेकायदा उभारण्यात आलेल्या जाहिरात फलकांवर महापालिकेने कारवाई केल्यानंतर जप्त केलेले लोखंडी आणि लाकडी सांगाडे पुन्हा मांडववाल्यांना देण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

शहरातील अनेक चौकांमध्ये तसेच रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात अनधिकृत जाहिरात फलक उभारण्यात आलेले आहेत. शहर विद्रुप करणाऱ्या या फलकांवर कारवाई करण्याचे आदेश महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी आकाशचिन्ह विभागाला दिले. मात्र, बेकायदा जाहिरात फलकांवर कारवाई करताना महापालिकेकडून दुजाभाव केला जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. बेकायदा फलकांवर कारवाईनंतर जप्त केलले लोखंडी आणि लाकडी सांगाडे पुन्हा मांडववाल्यांना देण्यात आल्याची तक्रार स्थानिक नागरिक नवनाथ पाटील यांनी महापालिका प्रशासनाकडे केली आहे.

वारजे भागातील माई मंगेशकर हॉस्पिटल ते आदित्य गार्डन या रस्त्यावर उभारलेल्या बेकायदा जाहिरात फलकांवर शुक्रवारी महापालिकेने कारवाई केली. या भागात रस्त्यांच्या दुतर्फा उभारलेल्या बेकायदा फलकांवर कारवाई करताना एका स्थानिक नेत्याच्या भावाच्या वाढदिवसाच्या बेकायदा फलकांवर मात्र कारवाई न करता त्याला अभय देण्यात आल्याचा आरोप पाटील यांनी केला आहे.

वारजे भागातील मारुती मंदिर ते आदित्य गार्डन या रस्त्याच्या कडेला महापालिकेने लॅान विकसित केले आहे. या लॅानवरच खड्डे घेऊन बेकायदा मोठे जाहिरात फलक उभारण्यात आले होते. जाहिरात फलक लावण्यासाठी घेण्यात आलेल्या या खड्ड्यांमुळे लॉनचे नुकसान झाले. या जाहिरात फलकांवर शुक्रवारी सकाळी महापालिकेने कारवाई सुरू केली. बेकायदा फलक फाडून ते अतिक्रमण विभागाचा गाडीत टाकण्यात आले. मात्र, लोखंडी सांगाडे मांडववाल्यांना का परत दिले? असा सवाल पाटील यांनी केला आहे.

वारजे भागातील बेकायदा जाहिरात फलकांवर महापालिकेने कारवाई केली. मात्र, ही कारवाई अर्धवट पद्धतीने करण्यात आली. ठरवीक जाहिरात फलक काढून टाकले. मात्र, काही बेकायदा फलकांवर कारवाई करण्याची हिंमत महापालिकेने दाखविली नाही. – नवनाथ पाटील, स्थानिक नागरिक

अडीच हजार फलकांवर कारवाई

महापालिकेच्या आकाशचिन्ह विभागाच्या वतीने शुक्रवारी शहरातील विविध भागांत केलेल्या कारवाईत अडीच हजार फ्लेक्स, बोर्ड, बॅनर काढण्यात आले. बेकायदा फलक, लावणाऱ्यांविरोधात गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत. ही कारवाई पुढेही सुरूच राहाणार असल्याचे आकाशचिन्ह विभागाचे उपायुक्त माधव जगताप यांनी सांगितले.