पुणे : डांबर खरेदीत घोटाळा झाल्याच्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर संबंधित ठेकेदाराकडून डांबराची खरेदी करण्याची निविदा रद्द करून आता कंपन्यांकडून डांबराची खरेदी करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय महापालिकेने घेतला आहे. महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांनी पत्रकारांशी बोलताना ही माहिती दिली. या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले असून, त्याचा अहवाल पुढील काही दिवसांत सादर होईल, असे भोसले यांनी सांगितले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

डांबर उत्पादक कंपन्यांकडून डांबर खरेदी करण्याऐवजी महापालिका ठेकेदारामार्फत डांबराची खरेदी करीत होती. त्यामुळे महापालिकेचे प्रतिटन चार ते पाच हजार रुपयांचे नुकसान होत होते. महापालिकेतील अधिकाऱ्यांना हाताशी धरून कोट्यवधी रुपयांचा डांबर घोटाळा झाल्याचा आरोप माजी सभागृह नेते नीलेश निकम यांनी काही दिवसांपूर्वी केला होता.

याबाबतची काही कागदपत्रे निकम यांनी महापालिका आयुक्तांकडे दिली होती. या पार्श्वभूमीवर आयुक्त भोसले यांना महापालिका ठेकेदारामार्फत डांबर खरेदी करीत असल्याबाबत विचारले असता ठेकेदाराची निविदा रद्द करण्यात आली आहे. यापुढील काळात थेट कंपनीकडून डांबराची खरेदी करण्याचे आदेश देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

महापालिकेला डांंबर पुरवठा करणाऱ्या ठेकेदाराने एकाच चलनावर खरेदी केलेले डांबर हे महापालिका आणि पीडब्ल्यूडीलाही विकल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला होता. त्यावरून निकम यांनी महापालिकेत डांबर घोटाळा होत असल्याचा आरोप केला होता. महापालिका काही वर्षांपूर्वी पेट्रोलियम कंपन्यांकडून थेट डांबराची खरेदी करत होती. मात्र, तत्कालीन महापालिका आयुक्त विक्रमकुमार यांनी थेट खरेदी बंद करत निविदा प्रक्रियेद्वारे ठेकेदारामार्फत ही खरेदी सुरू केली होती. एकाच ठेकेदाराला हे काम मिळत असल्याने यामध्ये गैरव्यवहार होत असल्याचे आरोप केले जात होते.

डांबर खरेदीत गैरव्यवहार झाल्याच्या आरोपाची चौकशी केली जात असून, पथ विभागाचे प्रमुख अनिरुद्ध पावसकर यांच्या माध्यमातून ही चौकशी सुरू आहे. तसेच यापूर्वीच्या ठेकेदाराची निविदा रद्द करण्यात आल्याचे महापालिका आयुक्त डॉ. भोसले यांनी सांगितले.

तत्कालीन आयुक्तांनी ठेकेदारामार्फत डांबर खरेदी करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार ही खरेदी केली जात असल्याचे पथ विभागाचे प्रमुख पावस्कर यांनी सांगितले. कंपनीकडून डांबराची थेट खरेदी केल्यानंतर वाहतुकीचा खर्च महापालिकेला करावा लागणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. डांबर खरेदीबाबत झालेल्या आरोपांची चौकशी केली जात असून, त्याचा अहवाल आल्यानंतर वस्तुस्थिती समोर येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. एक टन डांबर आणि वाहतूक यावर सर्वसाधारण साडेसात हजार रुपये खर्च होत असल्याचेही त्यांनी सांगितले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pune municipal commissioner announces decision to purchase asphalt directly from companies and to end contracting purchase pune print news asj