पुणे : कोंढवा परिसरात गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात होत असलेल्या अनधिकृत बांधकामांची नोंद महापालिकेने घेतली आहे. या भागात झालेल्या बेकायदा बांधकामांची तपासणी करून त्यावर कारवाई करण्यास बांधकाम विभागाने सुरुवात केली आहे. यासाठी ४० अभियंत्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

महापालिकेच्या वतीने कोंढवा भागातील अनधिकृत बांधकामांचा शोध घेऊन त्यावर कारवाई करण्याची मोहीम सुरू करण्यात आली आहे. या मोहिमेतंर्गत दोन बेकायदा इमारतींवर कारवाई करण्यात आली. शहर अभियंता प्रशांत वाघमारे व अधीक्षक अभियंता राजेश बनकर यांच्या मार्गदर्शनाखाली उप अभियंता दीपक सोनावणे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

या कारवाईमध्ये कोंढवा मलिकनगर येथील चार मजली आरसीसी आणि साईबाबानगर येथील तीन मजली आरसीसी अशा एकूण सुमारे ३,८०० चौरस फुटांच्या अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्यात आली. ही बांधकामे जमीनदोस्त करण्यात आल्याने या इमारती धोकादायक झाल्या आहेत. नागरिकांनी या ठिकाणी वास्तव्य करू नये अथवा या इमारतीमध्ये खरेदी-विक्रीचे व्यवहार करू नयेत, असे आवाहन महापालिकेने केले आहे.

महापालिकेने या भागात केलेल्या सर्वेक्षणामध्ये या परिसरात सुमारे ७० ते ८० अनधिकृत बांधकामे झाल्याचे समोर आले आहे. यातील काही ठिकाणी नागरिक राहायला आहेत. अशा इमारतींना नोटीस बजावून त्या रिकाम्या करण्यासाठी महापालिकेने पोलिसांची मदत घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार त्याचे प्रस्ताव तयार केले जात आहेत.

या इमारती दाट वस्तीच्या भागात असल्यामुळे प्रशासनाला कारवाई करताना अडचणी येत आहेत. त्यामुळे संबंधित भागांमध्ये काळजीपूर्वक पद्धतीने ही बांधकामे पाडली जात आहेत. एक ते दोन महिन्यांत सर्व अनधिकृत बांधकामे हटवण्यात येणार असल्याचे महापालिकेचे बांधकाम परवाना विभागाचे अधीक्षक अभियंता राजेश बनकर यांनी स्पष्ट केले. बेकायदा बांधकामे करणाऱ्यांच्या विरोधात पोलिसांकडे गुन्हादेखील दाखल केला जाणार असल्याचे बनकर यांनी सांगितले.

काय आहे प्रकरण

गेल्या काही वर्षांमध्ये शहराचे काही भाग झपाट्याने वाढत आहेत. यामध्ये कोंढवा, एनआयबीएम रस्त्यांचा समावेश आहे. कोंढवा परिसरात गेल्या काही महिन्यांपासून महापालिकेच्या बांधकाम विभागाची कोणतीही परवानगी न घेता बांधकामे केली जात आहेत. मोकळ्या जागांवर एक ते दीड गुंठांमध्ये अनधिकृतपणे तीन ते चार मजले इमारती उभ्या केल्या जात आहेत. या इमारतीमधील फ्लॅटची तसेच दुकानांची विक्री केली जात आहे. तर काही फ्लॅट भाड्याने देऊन त्यामधून उत्पन्न मिळवले जात आहे. कोंडव्यात होत असलेल्या बेकायदा बांधकामांच्या तक्रारी राज्याच्या अधिवेशनात करण्यात आल्या होत्या. येथे उभारण्यात असलेल्या बेकायदा इमारतींमध्ये कमी दरात फ्लॅट मिळत असल्याने नागरिकांकडून त्याची खरेदी विक्री केली जाते. या मध्ये नागरिकांची फसवणूक होत आहे. त्यामुळे ही बेकायला बांधकामे काढून टाकण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.