पुणे : राज्याची राजधानी असलेल्या मुंबई महापालिकेच्या पाठोपाठ सर्वात मोठी महापालिका अशी ओळख असलेल्या पुणे महापालिकेत भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. कनिष्ठ अभियंता (जूनियर इंजिनियर) या पदासाठी ही भरती होणार असून यामुळे अनेक तरुण अभियंत्यांना सरकारी नोकरी मिळणार आहे.

पुणे महापालिकेचे अंदाजपत्रक सुमारे बारा हजार कोटींच्या घरात गेले आहे. गेल्या काही वर्षात शहराचा विस्तार चारही दिशांना होत असून नव्याने अनेक गावे महापालिकेच्या हद्दीत समाविष्ट केली जात आहेत. त्यासाठी कनिष्ठ अभियंत्यांची भरती केली जाणार आहे. महापालिकेने १६९ जागांसाठी इच्छुकांकडून अर्ज मागवले आहेत. ही अर्ज प्रक्रिया १ ऑक्टोबरपासून सुरू देखील झाली आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख ३१ ऑक्टोबर २०२५ अशी ठेवण्यात आली आहे.

महापालिकेने यापूर्वी देखील अभियंता पदांसाठी भरती प्रक्रिया केली होती. मात्र, निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे काहीवेळा ही प्रक्रिया रखडली होती. मात्र यावेळी ही भरती प्रक्रिया कोणत्याही आचारसंहितेच्या काळात अडकणार नाही, याची काळजी घेतली आहे. यंदा आचारसंहितेपूर्वीच जाहिरात निघाल्यामुळे ही भरती वेळेत पूर्ण होईल, असा दावा महापालिका प्रशासनाकडून करण्यात आला आहे. ही भरती स्थायी पदांसाठी असून निवड झालेल्या उमेदवारांना कायमस्वरूपी महापालिकेच्या सेवेत सामील होता येणार आहे.

या भरती प्रक्रिये बाबत माहिती देताना महापालिकेच्या सामान्य प्रशासन विभागाचे उपायुक्त विजयकुमार थोरात म्हणाले, कनिष्ठ अभियंता पदाची भरती प्रक्रिया पारदर्शी पद्धतीने राबवली जाणार आहे. उमेदवारांनी भरलेल्या सर्व अर्जांची काळजीपूर्वक छाननी करून पात्र उमेदवारांची नियमानुसार निवड केली जाईल. पुढील दोन महिन्याच्या आत ही भरती प्रक्रिया पूर्ण करून पात्र ठरलेल्या यशस्वी उमेदवारांना महापालिकेच्या सेवेत रुजू करून घेण्याचा प्रयत्न राहणार आहे. या भरतीसाठी पात्र असलेल्या उमेदवारांनी वेळेत अर्ज दाखल करणे गरजेचे आहे.

महापालिकेत कनिष्ठ अभियंत्यांच्या भरतीसाठी कोण अर्ज करू शकतो. त्याच्या अटी, नियम तसेच शैक्षणिक पात्रता वयोमर्यादा नक्की काय आहेत. याची सविस्तर माहिती महापालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे. ही संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. अर्ज भरण्यापासून ते परीक्षा शुल्क भरणे या सर्व गोष्टी ऑनलाइन पद्धतीनेच होणार आहेत. या भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी इच्छुक उमेदवारांना आपली कागदपत्रे, शैक्षणिक प्रमाणपत्रे, अनुभवपत्रे आणि इतर आवश्यक कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करावी लागणार आहेत.

पुणे महापालिकेने यापूर्वी देखील अनेकदा भरती प्रक्रिया राबविली आहे. गेल्या काही वर्षांत महापालिकेतील कर्मचारी आणि अधिकारी वयोमानानुसार सेवानिवृत्त झाल्याने अनेक जागा या रिक्त आहेत. मनुष्यबळाची कमतरता पूर्ण करण्यासाठी महापालिकेच्या वतीने वेळोवेळी भरती प्रक्रिया राबविली जाते. महापालिकेने २०२२-२३ या वर्षासाठी ७४८ जागा आणि मार्च २०२४ मध्ये ११३ कनिष्ठ अभियंता पदांसाठी भरती प्रक्रिया राबविली होती. त्याला मोठा प्रतिसाद मिळाला होता. हजारोंच्या संख्येने इच्छुक उमेदवारांनी यासाठी अर्ज केले होते. या पार्श्वभूमीवर यंदाही मोठ्या संख्येने उमेदवार अर्ज येतील असा विश्वास महापालिका प्रशासनाकडून व्यक्त केला जात आहे.

युवक अभियंत्यांसाठी सुवर्णसंधी ठरणार

आंतरराष्ट्रीय पातळीवर सध्या सुरू असलेल्या घडामोडीमुळे खाजगी नोकऱ्यांवर सावट आले आहे. अनेक खाजगी कंपनीच्या व्यवस्थापनाने कर्मचाऱ्यांना राजीनामे देण्यास सांगितले आहे. यामुळे अस्थिरतेचे वातावरण तयार होत असताना पुणे महापालिकेत होणारी ही भरती अनेकांसाठी सुवर्णसंधी ठरणार आहे. या भरतीसाठी पात्र असलेल्या इच्छुकांनी अखेरच्या दिवसापर्यंत ची वाट न पाहता यासाठी अर्ज करावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. या भरती प्रक्रियेमुळे शहरातील रोजगाराच्या संधी वाढतील आणि तरुणांना सरकारी सेवेत भवितव्य घडवण्याची संधी मिळणार आहे, असे प्रशासनाने स्पष्ट केले.