पुणे : असमान रस्ते, रस्त्यांवरील खचलेली झाकणे, खड्डे चुकविताना होणारी वाहनचालकांची कसरत या समस्यांचा सामना नागरिकांना आजही करावा लागत असून, महापालिकेने मात्र एक एप्रिलपासून आतापर्यंत दहा हजारांहून अधिक खड्डे बुजविल्याचा दावा केला आहे. खड्ड्यांच्या दुरुस्तीसाठी महापालिकेच्या पथ विभागाने कनिष्ठ अभियंत्यांची नियुक्ती करून त्यांच्यावर कामाची जबाबदारी निश्चित केली असली, तरी अद्याप रस्त्यांवरील खड्ड्यांचे प्रमाण कायम असल्याचे चित्र आहे.

गेल्या चार दिवसांपासून शहरात कमी-अधिक प्रमाणात पडत असलेल्या पावसामुळे अनेक रस्त्यांवर खड्डे पडण्यास सुरुवात झाली असून, त्यामधून वाहने चालविताना नागरिकांची तारांबळ उडत असल्याची तक्रार नागरिक करीत आहेत. अनेक रस्त्यांवरील खड्डे दुरुस्त करण्यामध्ये महापालिकेला अपयश आल्याचा आरोप होत आहे. हे चित्र एकीकडे असताना एक एप्रिलपासून आतापर्यंत पथ विभागाने शहरातील १० हजारांपेक्षा अधिक खड्ड्यांची दुरुस्ती केल्याचा दावा केला आहे.

पावसाने उघडीप घेतल्यानंतर महापालिकेने खड्डे बुजविण्याचे काम हाती घेतले होते. त्यासाठी पथ विभागाने प्रत्येक महत्त्वाच्या रस्त्यासाठी अभियंत्याची नियुक्ती करून त्यावर जबाबदारी दिली होती. मात्र, गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे महापालिकेने बुजविलेले खड्डे पुन्हा उघडे पडले असून, त्यामधील खडी बाहेर येत आहे. काही ठिकाणी नव्याने खड्डे पडण्यास सुरुवात झाली आहे. यामुळे महापालिकेच्या कामाचा दर्जा पुन्हा एकदा समोर आला आहे.

रस्त्यावर खड्डे पडल्याची तक्रार महापालिकेकडे आल्यानंतर आणि पथ विभागातील अभियंत्यांना रस्त्यावर कुठे खड्डा पडल्याचे आढळल्यास तेथे दुरुस्तीचे काम केले जाते. महपालिकेच्या ‘पीएमसी केअर’ या ॲपबरोबर महापालिकेच्या कॉल सेंटरवर आलेल्या तक्रारींची दखल घेऊन ही खड्डे दुरुस्ती केली जाते. १ एप्रिलपासून आतापर्यंत १० हजार २६८ खड्डे पथ विभागाने बुजविले असून ११०४ चेंबरची दुरुस्ती करण्यात आली आहे, अशी माहिती पथ विभागाचे प्रमुख अनिरुद्ध पावसकर यांनी दिली. रस्त्यावर पडलेले खड्डे दुरुस्तीसाठी स्वतंत्र अभियंत्यांची नेमणूक करण्यात आली असून, त्यांच्याकडे जबाबदारी निश्चित करण्यात आल्याचे पावसकर यांनी सांगितले.

दोन अभियंत्यांना कारणे दाखवा’

रस्त्यावर पडलेले खड्डे योग्य पद्धतीने दुरुस्त न केल्याने कोंढवा वानवडी क्षेत्रीय कार्यालयातील दोन अभियंत्यांना कारणे दाखवा नोटीस बजावून त्यांच्याकडून खुलासा मागविण्यात आला आहे. गेल्या आठवड्यात कोंढवा भागातील खड्डा व्यवस्थित दुरुस्त न केल्याने ही नोटीस बजाविण्यात आली आहे. यामध्ये एका उपअभियंत्यासह एका कनिष्ठ अभियंत्याचा समावेश आहे. खड्डे दुरुस्तीचे काम सुरू असून यामध्ये दिरंगाई करणाऱ्यांवर कारवाई केली जात असल्याचे पावसकर यांनी स्पष्ट केले.

रस्त्यावर खड्डा पडल्याची तक्रार आल्यानंतर १२ मीटर रुंदीच्या वरील रस्त्याची जबाबदारी पथ विभागाची आहे. तर, १२ मीटर पेक्षा कमी रुंदी असलेल्या रस्त्याची जबाबदारी संबधित क्षेत्रीय कार्यालयांची आहे, असे उत्तर दिले जाते. यामुळे खड्डे दुरुस्तीसाठी विलंब होतो. या तक्रारी आल्यानंतर पथ आणि क्षेत्रीय कार्यालयातील अभियंता यांच्यावर संयुक्तिक जबाबदारी देण्यात आली आहे. यामध्ये दिरंगाई करणाऱ्यांवर कारवाई केली जाणार आहे.अनिरुद्ध पावसकर, मुख्य अभियंता, पथ विभाग, पुणे महापालिका

१ एप्रिल ते ३० जुलैपर्यंत पथ विभागाचे काम

– बुजवलेले खड्डे – १० हजार २६८

– उचलून घेतलेले, दुरुस्त केलेले ड्रेनेज चेंबर – ११०४

– पाणी साठणाऱ्या ठिकाणांचा निचरा – ३२७

– डांबरीकरण केलेला परिसर – ४२ हजार ६९३ चौरस मीटर

– वापरण्यात आलेला माल : १८ हजार ६७३ टन