पुणे : पुणे महापालिकेने भटक्या श्वानांना मायक्रोचिप बसविण्याचे पाऊल उचलले आहे. राज्यातील हा पहिलाच पथदर्शी प्रकल्प असून, यामुळे पुण्यातील भटक्या श्वानांची माहिती आता एका क्लिकवर उपलब्ध होणार आहे. मायक्रोचिपमुळे श्वानाचा विशिष्ट ओळख क्रमांक, त्याचे लिंग, रंग, वय यांसह इतर माहिती ऑनलाइन मिळू लागली आहे.

पुण्यातील भटक्या श्वानांची एकूण संख्या सुमारे तीन लाखांवर पोहोचली आहे. भटक्या श्वानांकडून नागरिकांवर हल्ले होण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहेत. यामुळे महापालिकेच्या पशुवैद्यकीय विभागाकडून श्वानांची नसबंदी करण्याची मोहीम सातत्याने राबविली जात आहे. याचबरोबर श्वानांना रेबीज प्रतिबंधक लसही दिली जात आहे. आता पशुवैद्यकीय विभागाने शहरातील श्वानांना मायक्रोचिप बसविण्यास सुरुवात केली आहे. मायक्रोचिप बसविल्यानंतर प्रत्येक श्वानाला विशिष्ट क्रमांक दिला जात आहे. त्या श्वानाला कधी पकडण्यात आले, त्याची नसबंदी करण्यात आली का, त्यानंतर त्याला कधी सोडण्यात आले यांसारखी माहिती ऑनलाइन उपलब्ध होऊ लागली आहे. यामुळे आगामी काळात कुत्र्यांची संख्या आटोक्यात आणण्यासाठी आणि रेबीज नियंत्रणासाठी हे पाऊल महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

याबाबत महापालिकेच्या मुख्य पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. सारिका फुंडे म्हणाल्या की, एका खासगी कंपनीकडून या चिप मोफत मिळाल्या आहेत. या चिप कुत्र्यांच्या खांद्याच्या भागात इंजेक्शनद्वारे टोचल्या जात आहेत. या चिपमध्ये आरएफआयडी तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. या मायक्रोचिपला विशिष्ट क्रमांक असून, तो कुत्र्याला मिळतो. कर्मचाऱ्याला त्याच्याकडील स्कॅनरच्या साहाय्याने कुत्र्याचा खांदा स्कॅन करून या क्रमांकाच्या आधारे त्याची सर्व माहिती मिळवता येते. सुरुवातीच्या टप्प्यात सहाशे कुत्र्यांना मायक्रोचिप लावण्याचे नियोजन करण्यात आले असून, याची सुरुवात झाली आहे.

मायक्रोचिपचा फायदा

  • खांद्यावर त्वचेच्या खालच्या स्तरावर बसविल्याने निघून जाण्याची शक्यता कमी
  • बनावट मायक्रोचिप बनवता येत नसल्याने सुरक्षिततेची हमी
  • विशिष्ट क्रमांकामुळे श्वानाची संपूर्ण माहिती ऑनलाइन उपलब्ध
  • एकदा बसविल्यानंतर पुन्हा बसविण्याची गरज नाही
  • श्वानाची नसबंदी, लसीकरणाची अद्ययावत माहिती ऑनलाइन उपलब्ध

भटक्या श्वानांना मायक्रोचिप बसविण्यास सुरुवात झाली आहे. आतपर्यंत तीन श्वानांना मायक्रोचिप बसविण्यात आली आहे. या श्वानांवर महिनाभर लक्ष ठेवण्यात येणार आहे. मायक्रोचिप बसविल्यानंतर त्यांना काही त्रास होत नसल्याची तपासणी महिनाभरानंतर केली जाईल. त्यानंतर इतर श्वानांना मायक्रोचिप बसविण्यात येईल. – डॉ. सारिका फुंडे, मुख्य पशुवैद्यकीय अधिकारी, पुणे महापालिका