पुणे : शहरातील प्रमुख रस्त्यांवर, चौकांमध्ये होणाऱ्या वाहतूक कोंडीला अडथळा ठरणारे अनावश्यक असलेले पादचारी मार्ग कमी केले जाणार आहेत. पुणे महापालिकेच्या अभियंत्यांनी रस्त्यावर उतरून केलेल्या पाहणीनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.

रस्त्यांवरील पदपथाची रुंदी कमी करताना ‘शहरी रस्ते मार्गदर्शक नियमावली’मध्ये (अर्बन स्ट्रीट डिझाइन गाडइलाइन) नमूद केलेल्या निकषांपेक्षा पादचारी मार्ग मार्ग लहान होणार नाहीत, याची काळजी घेणार असल्याचे पथ विभागाचे प्रमुख अनिरुद्ध पावसकर यांनी स्पष्ट केले.

वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी महापालिकेने विविध उपाययोजना करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी शहरातील प्रमुख ३२ रस्ते व २२ चौकांमध्ये सुधारणा केली जाणार आहे. अनावश्यक मोठे पादचारी मार्ग लहान केले जाणार आहेत. मात्र, हे करताना मार्गदर्शक तत्त्वांमध्ये तडजोड केली जाणार नाही, असे पावसकर यांनी सांगितले.

महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी वाहतूक शाखेच्या पोलिसांच्या मदतीने शहरातील वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. यासाठी ३२ रस्त्यांवर व २२ चौकांवर लक्ष केंद्रित केले आहे. महापालिकेच्या अभियंत्यांनी प्रत्यक्ष पाहणी करून वाहतुकीला अडथळा नक्की कशाने होतो, याचा अहवाल तयार केला आहे. यामध्ये काही रस्त्यांवर तसेच चौकांमध्ये पदपथ अनावश्यक मोठे असल्याचे कारण देण्यात आले आहे.

या पार्श्वभूमीवर महापालिका प्रशासन आणि वाहतूक पोलिसांची नुकतीच बैठक झाली. महापालिका, वाहतूक पोलिस, महावितरण, बीएसएनएल यासह इतर शासकीय विभागांना बरोबर घेऊन रस्त्यातील अडथळे दूर केले जाणार आहेत. हे अडथळे दूर करताना नियमांचे उल्लंघन केले जाणार नाही, असे पावसकर यांनी सांगितले.

पादचाऱ्यांच्या सुरक्षेला महापालिका प्राधान्य देते. पादचारी मार्गांची रुंदी कमी करण्याची तडजोड केली जाणार नाही. जंगली महाराज रस्ता, गोपाळकृष्ण गोखले रस्ता यासह अन्य मोठ्या रस्त्यांवरील पादचारी मार्गांची रुंदी कमी होणार नाही, असेही अनिरुद्ध पावसकर यांनी सांगितले.

पावसकर म्हणाले, पदपथांची रुंदी किती असावी, रस्त्यावरील पादचाऱ्यांची गर्दी विचारात घेऊन ठरवले जाईल. ज्या चौकात वाहनांना डावीकडे वळायला सोपे जाईल, अशा ठिकाणी पदपथाची रुंदी जास्त असेल, तर ती तेथे कमी केली जाईल. हे करताना नियमांचे उल्लंघन होणार नाही.