लोकसत्ता प्रतिनिधी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पुणे : शहरासाठी पवना धरणातील पाण्याचा वापर होत नसतानाही गेल्या वर्षी ०.४० अब्ज घनफूट (टीएमसी) एवढा पाणीसाठा महापालिकेने वापरला असल्याची माहिती जलसंपदा विभागाने कालवा सल्लागार समितीत दिली असल्याचे निदर्शनास आले आहे. पुण्याच्या पाण्याच्या हिशेबात पवनाचे पाणी दाखविल्याने शहराचा पाणीवापरही वाढल्याचे दिसून येत आहे.

कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत महापालिकेच्या वार्षिक पाणीवापर, मंजूर पाणी आरक्षण आणि प्रत्यक्ष पाणीवापर यामध्ये जलसंपदा विभागाने ही माहिती दिली आहे. खडकवासला धरण साखळी प्रकल्पातील पानशेत, वरसगाव, टेमघर आणि खडकवासला या चार धरणांतून शहराची तहान भागविली जाते. तसेच भामा-आसखेड धरणातून शहराच्या पूर्व भागाला पाणीपुरवठा केला जातो. या परिस्थितीमध्ये पवना धरणातील पाणी शहराच्या पाणीकोट्यात कसे धरण्यात आले, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरण क्षेत्रात पुरेसा पाणीसाठा असल्याने शहराला यंदा मुबलक पाणी मिळणार आहे. दर वर्षीप्रमाणे यंदाही २१ टीएमसी पाणी कोटा कायम ठेवण्याचा निर्णय कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत घेण्यात आल्याने सध्या तरी पाण्याची चिंता मिटली आहे.

खडकवासला, पवना, भामा-आसखेड या धरणातून अनुक्रमे ११.६० टीएमसी, ०.३४ टीएमसी आणि २.६७ असा एकूण १४.६१ टीएमसी पाणी आरक्षण मंजूर आहे. त्यातील गेल्या वर्षी (२०२३-२४) या कालावधीत खडकवासला धरणातून १८.७२ टीएमसी, पवना धरणातून ०.४२ टीएमसी आणि भामा-आसखेड धरणातून १.८७ टीएमसी असा एकूण २०.९९ टीएमसी पाणी वापर महापालिकेने केला आहे. चालू वर्षाचा विचार करता फेब्रुवारी अखेर पर्यंत खडकवासला धरणातून १२.०५, पवना धरणातून ०.२६ आणि भामा आसखेड धरणातून १.२३ टीएमसी असा एकूण १३.५५ टीएमसी एवढा पाणीवापर झाला आहे.

मंजूर पाणी आरक्षणानुसार महापालिकेला वार्षिक १४.६१ टीएमसी पाणीसाठा देण्यात आला आहे. त्यापैकी १३.५५ टीएमसी पाणीवापर झाल्याने उर्वरित १.०६ टीएमसी पाणीसाठा शिल्लक असल्याचेही कालवा सल्लागार समितीच्या टिपणीत नमूद करण्यात आले आहे. मात्र, महापालिकेचा दैनंदिन सरासरी पाणी वापराप्रमाणे उर्वरित कालावधीसाठी ७.५० टीएमसी अतिरिक्त पाणीसाठा राखीव ठेवण्यात आला आहे. हा पाणीसाठा जुलैपर्यंत महापालिकेला वापरता येणार आहे.

पवना धरणातून वाघोली गावातील पाणीपुरवठा योजनेला पाणी देण्यात येत आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून हे पाणी दिले जात आहे. हे प्रमाण अल्प आहे. -हनुमंत गुणाले, मुख्य अभियंता, जलसंपदा विभाग

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pune municipal corporation used 0 40 billion cubic feet of water storage in pawana dam pune print news apk 13 mrj