पुणे : महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी अंतिम प्रभागरचना जाहीर झाल्यानंतर प्रभागनिहाय आरक्षणाची सोडत आज (शुक्रवारी) १० ऑक्टोबरला होण्याची शक्यता होती. मात्र, आरक्षण सोडतीबाबत महापालिकेला कोणतेही आदेश न आल्याने ही सोडत लांबणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

महापालिका निवडणुकीसाठीची आरक्षण सोडत मंगळवारी (१३ ऑक्टोबरला) होऊ शकते, असे निवडणूक विभागाचे उपायुक्त प्रसाद काटकर यांनी सांगितले. त्यामुळे आरक्षण सोडतीकडे डोळे लावून बसलेल्या इच्छुकांना अजून काही दिवस थांबावे लागणार आहे.

महापालिका निवडणुकीसाठी होणाऱ्या आरक्षण सोडतीकडे अनेकांचे लक्ष लागले आहे. अंतिम प्रभागरचना जाहीर झाल्यानंतर निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक असलेल्यांनी प्रभागात फिरण्यास सुरुवात केली आहे. नागरिकांशी संवाद साधून प्रश्न सोडविण्यावर भर देण्यास सुुरुवात झाली आहे. तर, काही इच्छुकांनी प्रभागात आरक्षण नक्की कोणते पडते, यावर लक्ष केंद्रित केले आहे. आरक्षण सोडत निश्चित झाल्यानंतरच मतदारसंघात सक्रिय होण्याची भूमिका काहींनी घेतली आहे.

निवडणुकीसाठी अंतिम प्रभागरचना जाहीर झाल्यानंतर १० ऑक्टोबरला आरक्षणाची सोडत काढली जाईल, असे सांगण्यात येत होते. मात्र, आरक्षण सोडतीबाबत अद्याप कोणतेही आदेश आले नसल्याचे निवडणूक अधिकारी आणि उपायुक्त प्रसाद काटकर यांनी सांगितले. पुणे महापालिकेच्या निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांनी जोरदार तयारी केली आहे.

निवडणुकीसाठी इच्छुक असलेल्यांकडून शहरात दिसेल त्या ठिकाणी जाहिरातबाजी करून करून प्रभागात निवडणूक लढवणार असल्याचे सांगितले जात आहे. निवडणुकीची तयारी करताना उमेदवारांकडून विविध कार्यक्रमांचे आयोजन देखील केले जात आहे. गेल्या महिन्यात झालेल्या गणेशोत्सव, नवरात्रोत्सव या काळात वेगवेगळ्या कार्यक्रमांच्या माध्यमातून इच्छुकांनी मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला आहे.

आठवडाभरावर येऊन ठेपलेल्या दिवाळीसाठी देखील इच्छुकांनी जोरदार तयारी केली आहे. दिवाळी सणाचे औचित्य साधून मतदारांच्या घरापर्यंत तसेच त्यांच्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीपर्यंत कसे पोहोचता येईल याची नियोजन जोरदार सुरू आहे. यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे प्रयत्न देखील केले जात आहे. प्रभागातील ज्येष्ठ नागरिकांची संवाद, तरुण कार्यकर्त्यांचा वाढदिवस, महिला मंडळांसाठी कार्यक्रम यावर भर दिला जात आहे. प्रभागातील आरक्षणाची सोडत जाहीर झाल्यानंतर प्रचाराला अधिक वेग येणार आहे.

कर्मचारी, अधिकाऱ्यांना प्रशिक्षण

निवडणुकीच्या कामांचे कर्मचारी, अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देण्यासाठी महापालिकेने प्रशिक्षण कक्ष स्थापन केला आहे. या कक्षाच्या माध्यमातून कर्मचारी अधिकारी यांना वेगवेगळ्या पातळीवर प्रशिक्षण देण्याची तयारी प्रशासनाने केली आहे. यशदा येथील सहाय्यक प्राध्यापक यांच्यासह वेगवेगळ्या पातळीवरील प्रशिक्षकांची नियुक्ती महापालिकेने केली आहे. प्रशिक्षणाची जोरदार तयारी सध्या सुरू असून मतदार याद्या फोडत असताना त्यामध्ये कोणत्याही त्रुटी राहू नयेत, यासाठी प्रत्येकाकडे विशिष्ट जबाबदारी देण्याचे नियोजन सुरू असल्याचे निवडणूक विभागातील अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.