शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आज पुण्यामधील पत्रकार परिषदेमध्ये भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर निशाणा साधलाय. काही दिवसांपूर्वी पत्रकार परिषदेमध्ये चंद्रकांत पाटील यांनी आदित्य ठाकरेंच्या लग्नासाठीसुद्धा उद्धव ठाकरे मोदींना पत्र लिहतील असा टोला लगावला होता. त्यावरुनच आता संजय राऊत यांनी चंद्रकांत पाटलांनी आपण काय बोलतोय याचं भान ठेवणं गरजेचं असल्याचं म्हटलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

एक जून रोजी पुण्यातील पत्रकार परिषदेमध्ये सगळ्याच गोष्टींसाठी राज्य सरकार केंद्राकडे बोट दाखवत असल्याची टीका करताना चंद्रकांत पाटलांनी आदित्य ठाकरेंच्या लग्नाचा मुद्दा पकडत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या भूमिकेवर निशाणा साधला. याचसंदर्भात राऊत यांना आज पत्रकार परिषदेमध्ये प्रश्न विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना, “चंद्रकांत पाटील म्हणजे काही वसंतदादा पाटील नाहीत. ते विरोधी पक्षाचे प्रमुख आहेत. ते त्याचं मत मांडू शकतात. पण व्यक्तीगतरित्या बोलताना प्रमुख पदावरील व्यक्तीने आपण काय बोलतोय याचं भान ठेवलं पाहिजे. तुम्ही असं व्यक्तीगतरित्या कोणाकडे बोट दाखवाल तर काही बोटं तुमच्याकडेही वळलेली असतात हे लक्षात घ्यायला पाहिजे,” असं राऊत यांनी म्हटलं आहे.

नक्की वाचा >> WHO ला काय कळतं म्हणणाऱ्या राऊतांनी ‘ब्रेक द चेन’साठी दिला WHO चाच संदर्भ, म्हणाले…

चंद्रकांत पाटील नक्की काय म्हणाले होते?

सरकार प्रत्येक गोष्ट केंद्रावर ढकलत आहे. उद्या आदित्य ठाकरेंच्या लग्नासाठीसुद्धा उद्धव ठाकरे पंतप्रधांनांना पत्र लिहतील असा टोला चंद्रकांत पाटील यांनी लगावला होता. मराठा आरक्षणासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी लिहिलेल्या पत्रासंदर्भात चंद्रकांत पाटलांना प्रश्न विचारण्यात आलेला. त्यावेळी त्यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरही भाष्य केलं. महाविकास आघाडीला वाटतं की जनता मूर्ख आहे असंही ते यावेळी म्हणाले. गेल्या दीड वर्षांपासून राज्यात मागास आयोग नाही. त्यामुळे इथं केंद्राचा काहीही संबंध नाही. पण हे सरकार कोडगं आहे. उद्या आदित्य ठाकरेंच्या लग्नासाठी मुलगी बघायची असेल तेव्हा तुमच्या बघण्यातली दिल्लीतली कोण असेल तर सांगा म्हणून उद्धव ठाकरे पंतप्रधानांना पत्र लिहतील, अशी खोचक टीका चंद्रकांत पाटील यांनी केली होती.

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुनच संभाजी राजेंनी राजीनामा देण्याच्या तयारीसंदर्भातही यावेळी चंद्रकांत पाटील यांनी भाष्य करताना, संभाजी राजेंनी राजीनामा देऊन काय साध्य होणार आहे हे माझ्या लक्षात येत नाही, असं म्हटलं होतं. सरकार हेरगिरी कऱत असल्याविषयीच्या संभाजीराजेंच्या ट्विटबद्दल बोलताना, संभाजीराजेंनी ते ट्विट केलं, मात्र पुन्हा काही वेळाने आपण गृहमंत्र्यांशी याविषयी चर्चा केल्याचं सांगत दुसरं ट्विट केलं, असं चंद्रकांत पाटील पत्रकार परिषदेच्या शेवटी म्हणाल होते.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pune news sanjay raut slams chandrakant patil for comment on uddhav and aditya thackeray svk 88 scsg