पुणे, पिंपरी-चिंचवड शहर आणि बारामतीमध्ये १ सप्टेंबरपासून रिक्षाच्या वाढीव भाडेआकारणीची अंमलबजावणी सुरू होणार आहे. मात्र, बदललेल्या भाडेदरानुसार रिक्षा मीटरचे प्रमाणीकरण करून घेतल्याशिवय वाढीव भाडे आकारता येणार नाही. मीटरमध्ये दिसेल तेच भाडे प्रवाशाला लागू राहील, असे पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. रिक्षा मीटरच्या तपासणीसाठी पुणे शहरात आरटीओकडून शहरात पाच ठिकाणी व्यवस्था करण्यात आली असल्याची माहिती आरटीओकडून देण्यात आली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सीएनजीच्या दरात होत असलेली वाढ आणि खटुआ समितीची शिफारस लक्षात घेऊन २७ ऑगस्टच्या प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाच्या बैठकीत रिक्षासाठी अंतिम भाडेवाढ जाहीर करण्यात आली. रिक्षाच्या दीड किलोमीटरच्या पहिल्या टप्प्यासाठी सध्या २१ रुपये भाडे आकारणी केली जाते. त्यानंतरच्या प्रत्येक किलोमीटरसाठी १४ रुपये आकारले जातात. नव्याने केलेल्या भाडेवाढीनुसार पहिल्या दीड किलोमीटरसाठी २५ रुपये, तर त्यानंतरच्या प्रत्येक किलोमीटरसाठी १७ रुपये आकारण्यात येतील. म्हणजेच पहिल्या दीड किलोमीटरसाठी चार रुपये, तर नंतरच्या प्रत्येक किलोमीटरसाठी तीन रुपयांची दरवाढ करण्यात आली आहे. ही दरवाढ १ सप्टेंबरपासून लागू करण्यात येणार आहे.

वाढीव भाड्याची आकारणी करण्यासाठी रिक्षा चालकांना मीटरचे प्रमाणीकरण करून घेणे आवश्यक आहे. त्याशिवाय वाढीव भाड्याची आरकारणी करता येणार नाही. मीटरच्या प्रमाणीकरणासाठी ३१ सप्टेेंबरपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. मीटरच्या तपासणीसाठी शहरात पाच ठिकाणी व्यवस्था करण्यात आली आहे. कर्वेनगर येथील अलंकार पोलीस स्थानकासमोर, फुलेनगर येथील आळंदी रस्ता चाचणी मैदान, रामटेकडी इंडस्ट्रियल इस्टेटमधील इगलबर्ग कंपनी लेन क्रमांक तीन, दिवे येथील चाचणी मैदान, इऑन आयटी पार्कजवळ खराडी पोलीस चौकीसमोर आदी ठिकाणी १ सप्टेंबरपासून सकाळी सात ते दुपारी चार या वेळेत मीटर तपासणी करण्यात येणार आहे.

मुदतीमध्ये मीटरचे प्रमाणीकरण करून घ्यावे –

“रिक्षा चालकांनी दिलेल्या मुदतीमध्ये बदललेल्या भाडेदरानुसार मीटरचे प्रमाणीकरण करून घ्यावे. मीटरचे प्रमाणीकरण झाल्याशिवाय वाढीव भाडे आकारणी करता येणार नाही.” अशी प्रतिक्रिया पुणे प्रादेशिक परिवहन अधिकारी डॉ. अजित शिंदे यांनी दिली आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pune no additional rickshaw fare without meter validation pune print news msr