पुणे : कला आणि विद्या हातात हात घालून नांदत असलेल्या पुण्यात सांसारिक गरज म्हणून मंदाकिनी परांजपे यांनी १९५० मध्ये सुरू केलेल्या पेंटिंग आणि भरतकाम क्लासची अमृतमहोत्सवपूर्ती नुकतीच झाली. हे औचित्य साधून परांजपे क्लासच्या वतीने बुधवारपासून (१२ नोव्हेंबर) घोले रस्त्यावरील राजा रविवर्मा कलादालन येथे भरविण्यात येत असलेल्या ‘वारसा रेशमांचा’ या भरतकामाच्या विविध कलावस्तूंच्या प्रदर्शनाचे उद्घाटन ज्येष्ठ कवयित्री डाॅ. अरुणा ढेरे यांच्या हस्ते होणार आहे. हे प्रदर्शन रविवारपर्यंत (१६ नोव्हेंबर) सकाळी अकरा ते सायंकाळी सात या वेळात खुले राहणार आहे.
‘धागा धागा अखंड विणू या’ असे जणू व्रत घेतलेल्या मंदाकिनी परांजपे यांनी १९५० मध्ये असा क्लास सुरू करणे ही विशेष बाब होती. मेहनत, चिकाटी आणि एकाग्रता हे गुण स्वतःपुरते मर्यादित न ठेवता प्रत्येक विद्यार्थिनीपर्यंत पोहोचविण्याचे काम त्यांनी केले. एका कापडावर सगळ्या प्रकारचे टाके शिकवून झाल्यानंतर साडी, फ्रेम, टेबलक्लॉथ, बेडशीट, पांघरूण अशा वस्तू तयार करायला शिकवणे असा क्रम असे. टाके शिकत असताना प्रत्येक टाका सुंदर, रेखीव येईपर्यंत उसवून पुन्हा घालायला लावण्याचे काम त्यांच्यातील हट्टी शिक्षकाने केले.
परांजपे यांच्या सूनबाई ललिता परांजपे याही कलेचा वारसा जपणाऱ्या निघाल्या. सासूबाईंच्या तालमीत तयार झालेल्या ललिताताई आजही क्लासची जबाबदारी यशस्वीरीत्या सांभाळत आहेत. या कलेला राष्ट्रीय पातळीवर मान्यता मिळवून देण्याची किमया ललिता परांजपे यांनी साधली आहे. ‘मदुरा कोट्स’ कंपनीतर्फे घेण्यात आलेल्या भरतकामाच्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी ललिता परांजपे यांनी चार महिने कष्ट करून बैलगाड्या, टोपल्या, नऊवारी साडीतली महिला, तिचा टोपल्या विणणारा पती अशी फ्रेम साकारली. या कंपनीने ललिता परांजपे यांनी केलेले ‘श्री गणेश’ हे चित्र खरेदी करून लंडनच्या कार्यालयामध्ये ठेवले आहे. रशियामध्ये भरवलेल्या १९८८ मध्ये प्रदर्शनासाठी ‘बॅले डान्सर’ या चित्राची निवड करण्यात आली होती.
मंदाकिनी आणि ललिता परांजपे यांच्या क्लासची यशस्वी घोडदौड चालू होती. हजारो स्त्रियांना भरतकाम शिकवून त्यांच्याकडून सुंदर वस्तू बनवून घेताना त्यांच्यात कलाप्रेम आणि आत्मविश्वास जागृत ठेवण्याचे काम केले. यशवंतराव चव्हाण, आचार्य अत्रे, पं. भीमसेन जोशी, ज्योत्स्ना भोळे अशा मान्यवर व्यक्तींनी त्यांचे वेळोवेळी कौतुक केले.
दसऱ्याला परांजपे क्लासची पंचाहत्तरीपूर्ती झाली. डिजिटल युगाचा जमाना असला, तरीही कलेला उच्च दर्जा देण्याचा वसा जोपासण्याचे कार्य करणाऱ्या परांजपे क्लासमध्ये प्रवेशासाठी प्रतीक्षा यादी असते. हा वारसा आता तिसऱ्या पिढीमध्ये गेला असून, ललिता परांजपे यांच्या अरुंधती आणि अदिती या दोन्ही मुली मुंबईमध्ये क्लास चालवून अनेक विद्यार्थिनी घडवित आहेत.
बालसाहित्याचा नंदादीप
अमरेंद्र गाडगीळ आणि भा. रा. भागवत या बालसाहित्यकारांनी स्थापना केलेल्या अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संस्थेचा सुवर्णमहोत्सवी सांगता समारंभ हा संस्थेच्या वाटचालीतील एक महत्त्वाचा टप्पा. हा टप्पा पार करत असतानाच मराठी शाळांची घटती संख्या, शालेय मुलांमध्ये मराठीपेक्षाही इंग्रजी भाषा शिकण्याचे असलेले आकर्षण अशी आव्हाने समोर ठाकली आहेत. बालकुमार साहित्यामध्ये मोलाची भर घालण्याबरोबरच बालसाहित्याचा नंदादीप तेवत ठेवण्याच्या अग्निदिव्यातून या संस्थेच्या नव्या फळीतील पदाधिकाऱ्यांना जावे लागणार आहे. संस्थेच्या सुवर्णमहोत्सव सांगतेनिमित्त बालदिनाचे औचित्य साधून शुक्रवारी (१४ नोव्हेंबर) बालसाहित्यकारांचा मेळावा होत आहे.
एस. एम. जोशी सभागृहात सकाळी दहा वाजता होणाऱ्या कार्यक्रमात बालकुमार सुवर्णगाथा स्मरणिकेचे प्रकाशन महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे यांच्या हस्ते होणार असून ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते गिरीश प्रभुणे कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषविणार आहेत. दिलीप प्रभावळकर, बाबा भांड, माधुरी पुरंदरे, राजीव तांबे, ल. म. कडू, सलीम सरदार मुल्ला, आबा महाजन, संजय वाघ, डॉ. संगीता बर्वे, एकनाथ आव्हाड, भारत सासणे आणि डॉ. सुरेश सावंत या साहित्य अकादमीच्या बालसाहित्य पुरस्कारप्राप्त लेखकांचा सन्मान अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांच्या हस्ते होईल. ज्येष्ठ संपादक महावीर जोंधळे, डॉ. न. म. जोशी, सूर्यकांत सराफ, गोविंद गोडबोले, मदन हजेरी अशा बालकुमार साहित्य संमेलनाच्या माजी अध्यक्षांनाही सन्मानित करण्यात येणार आहे. मुलांना वाचनाची गोडी लागण्यासाठी पाच शाळांना प्रत्येकी ५० बालसाहित्याच्या पुस्तकांचा संच संस्थेतर्फे भेट दिला जाणार आहे.
vidyadhar.kulkarni@expressindia.com
