पुणे : कंपनी अस्तित्वात नसताना १०४ कामगारांच्या नावे बनावट भविष्य निर्वाह खाते (प्रोव्हिडंट फंड) उघडून फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला. बनावट खाते उघडल्याचा प्रकार भविष्य निर्वाह निधी कार्यालयाला माहिती नव्हती. काही कामगारांना खाते बंद करुन पैसे काढण्यासाठी धमकाविण्यात आल्याचा संदेश समाज माध्यमातून पाठविण्यात आला. त्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी वानवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

याप्रकरणी श्री गणेश एंटरप्रायजेसचा मालक सीताराम ठकाणसिंग याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत भविष्य निर्वाह निधी कार्यालयातील अधिकारी जयकिसन मोहनदास मनवानी (वय ४९, रा. महेश सोसायटी, बिबवेवाडी) यांनी वानवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, श्री गणेश एंटरप्रायजेसचे सीताराम ठकाणसिंग (रा. साठे वस्ती, सणसवाडी) यांनी भविष्य निर्वाह निधी कार्यालयाच्या संकेतस्थळावर श्री गणेश एंटरप्रायजेस या फर्मच्या नोंदणी केली होती. २३ डिसेंबर २०२० रोजी त्यांनी याबाबत अर्ज केला होत. त्यानंतर त्यांना कार्यालयाकडून सांकेतिक क्रमांक देण्यात आला. या कंपनीत १०४ कामगाराच्या नावे ऑनलाइन पद्धतीने ‘पीएफ’ खाते उघडण्यात आले. त्यानंतर श्री गणेश एंटरप्रायजेस नाव असलेल्या वेगवेगळ्या कंपनीतील ११ कर्मचाऱ्यांनी ईमेलद्वारे जून २०२४ मध्ये भविष्य निर्वाह निधी कार्यालयाकडे तक्रार दिली. संबंधित कंपनीत काम केले नसल्याचे त्यांनी कळविले होते. त्यांच्या संमतीशिवाय बनावट ‘पीएफ’ खाते उघडण्यात आल्याच्या तक्रारी करण्यात आल्या. संबंधित खाते रद्द करण्यासाठी अज्ञाताने समाज माध्यमातून संदेश पाठविला असून, तो पैसे मागत असल्याच्या तक्रारी करण्यात आल्या.

याबाबत चार कर्मचाऱ्यांनी ते वास्तव्यास असलेल्या सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दिल्या होत्या. त्यानंतर भविष्य निर्वाह निधी कार्यालयातील क्षेत्रीय आयुक्त श्री गणेश एंटरप्रायजेस या फर्मच्या मालकांचे पडताळणी करण्याचे आदेश दिले. त्यानुसार फिर्यादी मनवानी, त्यांचे सहकारी डी. एस. तिलवणकर, अधिकारी अमोद देशपांडे हे ३१ जुलै २०२४ रोजी नगर रस्त्यावरील सणसवाडीत असलेल्या साठे वस्तीतील श्री गणेश एंटरप्रायजेस या कंपनीच्या कार्यालयाची पाहणी करण्यासाठी गेले. तेव्हा या भागात अशा प्रकारची कंपनी अस्तित्वात नसल्याचे आढळून आले. कंपनीचे मालक सीताराम ठकाणसिंग यांचा ठावठिकाणा लागला नाही. बनावट कंपनीच्या नावे ठकाणसिंग याने कामगारांच्या नावे बनावट ‘पीएफ’ खाते उघडल्याचे उघडकीस आले. त्यानंतर १ ऑगस्ट २०२४ राेजी भविष्य निर्वाह निधी कार्यालयातील आयुक्तांना अहवाल सादर करण्यात आला. आठ महिन्यांनी पोलिसांकडे तक्रार देण्यात आली. याप्रकरणी श्री गणेश एंटरप्रायजेसचा मालक सीताराम ठकाणसिंग याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस उपनिरीक्षक धीरज कांबळे तपास करत आहेत.

बनावट ‘पीएफ’ खात्याविषयी अनेक प्रश्न उपस्थित ?

ठकाणसिंग याने बनावट ‘पीएफ’ खाते उघडले, तसेच बनावट दुकान परवाना काढल्याचे उघडकीस आले आहे. १०४ कामगारांच्या नावाने बनावट ‘पीएफ’ खाते काढण्यात आले. या खात्यात कंपनी मालक दरमहा भविष्य निर्वाह निधीची रक्कम भरत नव्हता, ही बाब भविष्य निर्वाह निधी कार्यालयातील अधिकाऱ्यांना लक्षात कशी आली नाही. कंपनी अस्तिवात नसताना दुकान परवाना कसा मिळविला, तसेच बनावट खाते काढण्याचा नेमका उद्देश काय होता, यादृष्टीने पोलिसांना तपास करावा लागणार आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pune pf accounts of 104 workers were opened by setting up a fake company pune print news ssb