पुणे : नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी ‘सीसीटीव्ही’च्या केबल टाकरण्यासाठी महापालिकेने पोलीस विभागाला शहराच्या मध्यवर्ती भागातील पेठांच्या परिसरात रस्ते खोदाईची परवनागी दिली आहे. मात्र, पोलिसांनी नेमलेल्या ठेकेदाराने ही संधी साधून शहरातील विविध भागात रस्ते खोदाई केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. महापालिकेकडून आता संबंधित ठेकेदाराला नोटीस बजावण्यात येणार आहे.

महापालिकेच्या पथ विभागाकडून शहरात विविध सेवा वाहिन्या टाकण्यासाठी शासकीय, निमशासकीय तसेच खासगी संस्थांना ठरावीक शुल्क आकारून रस्ते खोदाईची परवानगी दिली जाते. विविध कामे करण्यासाठी पथ विभागाकडून एक ऑक्टोबर ते ३१ एप्रिलपर्यंत खोदाईसाठी परवानगी दिली जाते. त्यानंतर एक मे रोजी शहरातील खोदाईची कामे बंद करुन पावसाळा सुरू होण्यापूर्वी ३१ मे पर्यंत खोदण्यात आलेले रस्ते दुरुस्त करुन ते पूर्वस्थितीत आणणे बंधनकारक असते. पथ विभागाकडून पावसाळ्यापूर्वी शहरातील रस्त्यांची दुरुस्ती केली जाते.

पावसाळ्यामध्ये रस्त्यांवर खड्डे पडल्याने वाहतुकीची कोंडी होते. त्यामुळे महापालिका प्रशासन पावसाळ्याच्या काळात केवळ अति महत्वाच्या, तातडीची निकड या कामासाठीच रस्ते खोदाईची परवानगी देते. त्यानुसार पथ विभागाने शहरातील पेठांच्या भागात रस्ते खोदण्यासाठी परवानगी दिली. नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक असलेली ‘सीसीटीव्ही’ कॅमेऱ्यांची यंत्रणा कार्यान्वित करण्यासाठी महापालिकेने पोलीस विभागाला रस्ते खोदाईसाठी परवानगी दिली आहे.

ही परवानगी देताना महापालिकेने ही खोदाई केवळ पेठांच्या परिसरातच राहणार आहे, स्पष्ट केले होते. मात्र याकडे दुर्लक्ष करत पोलिसांनी नेमलेल्या ठेकेदाराने शहरातील इतर भागातील रस्ते हे सीसीटीव्ही केबल टाकण्यासाठी खोदल्याचे निदर्शनास आले आहे.

गुन्हा दाखल करण्याची धमकी

‘सीसीटीव्ही’ केबलसाठी खोदकाम करण्याचे काम दिलेल्या ठेकेदाराकडून गॅस कंपन्यांनी टाकलेल्या वाहिन्या, विद्युत वाहिन्या याकडे दुर्लक्ष करण्यात येते. त्यामुळे मोठी दुर्घटना घडू शकते, ही बाब ठेकेदाराच्या कामगारांच्या निदर्शनास आणून दिली. मात्र, ठेकेदाराने पोलिसांना ही माहिती दिल्यावर पोलीस कर्मचारी घटनास्थळी आले. त्यांनी गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली. याबाबत महापालिकेच्या पथ विभागाकडे दिली आहे’ असे सहदेव ढावरे यांनी सांगितले.

पोलिसांना सीसीटीव्ही केबल टाकण्यासाठी शहराच्या मध्यवर्ती भागातील पेठेच्या परिसरात रस्ते खोदण्यासाठी परवानगी दिली आहे. मात्र, पोलिसांनी नेमलेल्या ठेकेदाराने अन्य रस्त्यांवर खोदाई केल्याच्या तक्रारी आल्या आहेत. संबंधित ठेकेदाराने नोटीस बजावून समजपत्र दिले जाणार आहे. – अनिरुद्ध पावसकर, मुख्य अभियंता, पथ विभाग