पुणे : मौजमजेसाठी दुचाकींची चोरी करणाऱ्या उच्चशिक्षित तरुणाला गुन्हे शाखेने अटक केली आहे. चोरलेल्या दुचाकींची विक्री करण्यासाठी तरुण समाज माध्यमातील जाहिरात यंत्रणेचा (मार्केट प्लेस) वापर करत असल्याचे उघडकीस आले आहे. त्याच्याकडून साडेआठ लाख रुपयांच्या १४ दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत.

महादेव शिवाजी गरड (वय २६, सध्या रा. मांजरी, हडपसर, मूळ रा. चाकूर, जि. लातूर) असे अटक करण्यात आलेल्या चोरट्याचे नाव आहे. गुन्हे शाखेच्या युनिट पाचचे पथक गस्त घालत होते. त्या वेळी गरड याला संशयावरुन ताब्यात घेतले. चौकशीत त्याच्याकडे असलेली दुचाकी चोरीची असल्याची माहिती मिळाली. गरड याची चौकशी करण्यात आली. तेव्हा त्याने मौजमजेसाठी दुचाकी चोरीचे गुन्हे केल्याची कबुली दिली. त्याच्याकडून १४ दुचाकी जप्त करण्यात आल्या.

गरडने हडपसर भागातून सहा दुचाकी, तसेच पिंपरी-चिंचवड शहरातून पाच दुचाकी अशा १४ दुचाकी चोरल्या. अतिरिक्त पोलीस आयुक्त पंकज देशमुख, उपायुक्त विवेक मासाळ, सहायक आयुक्त राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पतंगे, अभिजित पवार, विनोद शिवले, प्रताप गायकवाड विनोद निंभोरे, अमित कांबळे, अकबर शेख, राजस शेख, प्रमोद टिळेकर, शहाजी काळे, पृथ्वीराज पांडुळे, स्वाती तुपे, पल्लवी मोरे यांनी ही कामगिरी केली.

दुचाकी चोरीसाठी समाजमाध्यमातील ‘मार्केटप्लेस’चा वापर

आरोपी महादेव गरड हा पदवीधर असून, झटपट पैसे कमविण्यासाठी त्याने दुचाकी चोरीचे गुन्हे केले. दुचाकी चोरल्यानंतर तो समाजमाध्यमातील ‘मार्केटप्लेस’द्वारे कमी किमतीत दुचाकींची विक्री करत होता. खासगी वित्तीय संस्थेचे हप्ते थकल्याने दुचाकींची स्वस्तात विक्री करत असल्याची बतावणी तो करायाचा, असे गुन्हे शाखेचे अतिरिक्त पोलीस आयुक्त पंकज देशमुख यांनी सांगितले.

नगर रस्ता परिसरातून दुचाकी चोरणारे अटकेत

नगर रस्ता परिसरातून दुचाकी चोरणाऱ्या चोरट्यांना गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. त्यांच्याकडून दोन दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. दीपक राजेंद्र बिडगर (वय २३, रा. न्हावरा, ता. शिरूर), मच्छिंद्र दिगंबर खैरनार (वय ४१, रा. रांजणगाव, ता. शिरूर ) अशी अटक केलेल्या चोरट्यांची नावे आहेत. नगर रस्ता परिसरातील शिक्रापूर भागातून बिडगरने दुचाकी चोरली होती.

पेरणे फाटा परिसरात एक जण चोरलेली दुचाकी विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती पोलीस कर्मचारी सचिन पवार यांना मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने सापळा लावला. पोलिसांनी बिडगरला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने दुचाकी चोरल्याची कबुली दिली. त्याला शिक्रापूर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे. वाघोलीतील भावडी रस्त्यावर खैरनारला सापळा लावून पकडले. चौकशीत त्याने म्हाळुंगे परिसरातून दुचाकी चोरल्याची कबुली दिली. त्याच्याकडून दुचाकी जप्त करण्यात आली. पोलीस निरीक्षक वाहीद पठाण, सहायक निरीक्षक राकेश कदम, मदन कांबळे, बाळासाहेब सकट आणि पथकाने ही कारवाई केली.