पुणे : ‘महापालिकेने ठराविक भागात रस्ते खोदाईची परवानगी दिलेली असताना त्याकडे दुर्लक्ष करून मनमानी पद्धतीने सीसीटीव्ही केबल टाकणाऱ्या पोलिसांच्या ठेकेदाराला महापालिकेने कडक शब्दांत समजपत्र दिले आहे. यापुढील काळात दिलेल्या परवानगीपेक्षा इतर ठिकाणी रस्ते खोदताना आढळल्यास कडक कारवाई करण्यात येईल,’ असा इशारा देण्यात आला आहे. तसेच, दिवाळीपर्यंत सध्या सुरू असलेली रस्ते खोदाई बंद ठेवावी, असे पत्र महापालिकेने ठेकेदाराला दिले आहे.
महापालिकेचे पथ विभागाचे प्रमुख अनिरुद्ध पावसकर यांनी ही माहिती दिली. ‘सीसीटीव्ही’च्या केबल टाकण्यासाठी महापालिकेने पोलीस विभागाला शहराच्या मध्यवर्ती भागातील पेठांच्या परिसरात रस्ते खोदाईची परवानगी दिली आहे. मात्र, पोलिसांनी नेमलेल्या ठेकेदाराने संधी साधून शहरातील विविध भागांत रस्ते खोदाई केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
ठेकेदाराला खोदाई करण्यासाठी महापालिकेने दिलेली परवानगी आणि ठेकेदाराने प्रत्यक्षात खोदलेले रस्ते याचे पुरावेच महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी पोलिस आयुक्तांबरोबर झालेल्या बैठकीत सादर केले. महापालिकेने पोलीस आयुक्तांना या ठेकेदाराने चुकीच्या पद्धतीने कसे काम केले याचे २८ फोटो दाखविले. त्यानंतर पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी संबंधित ठेकेदाराला सुनावून यापुढील काळात महापालिकेकडे तक्रार येऊ न देण्याची समज दिल्याचे पावसकर यांनी सांगितले.
सीसीटीव्ही केबल टाकण्यासाठी पोलिसांनी नेमलेल्या या ठेकेदाराला महापालिकेने कडक शब्दांत समजपत्र पाठविले आहे. यामध्ये पुढील काळात ठेकेदाराने महापालिकेच्या नियमांचे उल्लंघन केल्यास कठोर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. तसेच, दिवाळीनिमित्त नागरिक मोठ्या संख्येने खरेदीसाठी मध्यवर्ती पेठांच्या भागात येतात. तेथेच रस्ते खोदाई सुरू असल्याने त्याचा त्रास नागरिकांना आणि पादचाऱ्यांना होतो. त्यामुळे दिवाळीपर्यंत रस्ते खोदाईची कामे बंद ठेवावी, असे पत्र महापालिकेने ठेकेदाराला दिले आहे.
नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक असलेली ‘सीसीटीव्ही’ कॅमेऱ्यांची यंत्रणा कार्यान्वित करण्यासाठी महापालिकेने पोलीस विभागाला रस्ते खोदाईसाठी परवानगी दिली आहे. मध्यवर्ती पेठांच्या भागात केवळ ही परवानगी महापालिकेने दिली आहे. मात्र, ठेकेदाराने इतर भागातही खोदाई सुरु केली होती. या पार्श्वभूमीवर पोलिस आयुक्तांच्या कार्यालयात झालेल्या आढावा बैठकीत महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी बाजू मांडली. त्यानंतर संबंधित ठेकेदाराला समजपत्र देण्यात आले आहे.
पथ्य विभागाचे प्रमुख अनिरुद्ध पावसकर म्हणाले, महापालिकेने रस्ते खोदाई केवळ पेठांच्या परिसरापुरती मर्यादित असताना इतर भागांत रस्ते खोदाई करण्यात आली. दररोज ठराविक मीटर रस्ते खोदणे अपेक्षित असताना किलोमीटर अंतराची खोदाई ठेकेदाराने केली. त्यामुळे महापालिकेने कडक शब्दांत ठेकेदाराला पत्र पाठविले आहे. पोलिस आयुक्तांच्या निदर्शनास ही बाब आणून दिली आहे.