पुणे : अवैधरीत्या वाळूचा उपसा करणाऱ्या सराईत गुन्हेगाराविरुद्ध पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने कारवाईचा बडगा उगारला आहे. थेऊर ते कोलवडी नदीपात्रात सुरू असलेले उत्खनन थांबवून ट्रॅक्टर, पोकलँड यंत्रासह तब्बल ३५ लाख ४० हजारांचे साहित्य ताब्यात घेण्याची कारवाई बुधवारी (७ मे) करण्यात आली. पंकज सदाशिव गायकवाड (वय ३८ रा. भैरोबा वस्ती, कोलवडी, ता. हवेली) असे कारवाई केलेल्या सराइताचे नाव आहे.

लोणीकंद पोलीस ठाण्याच्या हद्दीतील थेऊर ते कोलवडी गावातील मुळा-मुठा नदीपात्रामध्ये अवैध वाळू उपसा सुरू असल्याची माहिती युनिट सहाला मिळाली. त्यानुसार पथकाने त्या ठिकाणी धाव घेतली असता, कोलवडीत ट्रॅक्टर आणि पोकलँड दिसून आले. या वेळी आरोपी पंकज गायकवाड याला पकडण्यात आले. त्या ठिकाणी वरील पोकलँड, दोन ट्रॅक्टर, ८ ब्रास वाळू असे ३५ लाख ४० हजारांचे साहित्य पथकाने जप्त केले.

ही कारवाई अपर पोलीस आयुक्त शैलेश बलकवडे, उपायुक्त निखिल पिंगळे, राजेंद्र मुळीक, पोलीस निरीक्षक वाहिद पठाण, सहायक पोलीस निरीक्षक मदन कांबळे, पोलीस उपनिरीक्षक रामकृष्ण दळवी, बाळासाहेब सकटे, रमेश मेमाणे, नितीन मुंढे, कानिफनाथ कारखेले, सुहास तांबेकर, हृषीकेश ताकवणे, सचिन पवार, हृषीकेश व्यवहारे, शेखर काटे, गणेश डोंगरे, नितीन धाडगे, बाळासाहेब तनपुरे, प्रतीक्षा पानसरे, कीर्ती मांदळे यांनी केली.

पंकज गायकवाड सराईत गुन्हेगार

आरोपी पंकज गायकवाड हा सराईत असून, त्याच्याविरुद्ध विविध पोलीस ठाण्यांतर्गत गुन्हे दाखल आहेत. प्रामुख्याने कोंढवा, हडपसर, पौड, लोणीकंद पोलीस ठाण्यांशी संबंधित गुन्हे दाखल आहेत. त्याला हडपसर ठाण्यांतर्गत दाखल गुन्ह्यांत दोन वर्षे तडीपारही करण्यात आले होते. मात्र, त्यानंतरही त्याच्या वर्तणुकीत सुधारणा होत नसल्याचे दिसून आले आहे. अवैधरीत्या वाळू उपसा करताना त्याला रंगेहाथ पकडण्यात आले आहे.