महापालिका भवन परिसरात नागरिकांकडील मोबाइल संच लांबविणाऱ्या अल्पवयीन मुलाला शिवाजीनगर परिसरात पकडण्यात आले. त्याच्याकडून १८ मोबाइल संच जप्त करण्यात आले आहेत.
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर महापालिका भवन परिसरात शिवाजीनगर पोलिसांचे पथक गस्त घालत होते. त्या वेळी महापालिका भवन परिसरात एक अल्पवयीन मुलगा थांबला असून त्याने मोबाइल चोरीचे गुन्हे केल्याची माहिती तपास पथकाला मिळाली. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले.
हेही वाचा >>> भाजप नेत्याने तहसीलदारांना झापले ; मावळ तहसील कार्यालयात दलालांचा धुमाकूळ सुरु असल्याचा केला आरोप
चौकशीत त्याने महापालिका भवन परिसरात मोबाइल चोरीचे गुन्हे केल्याची कबुली दिली. त्याच्याकडून १८ मोबाइल संच जप्त करण्यात आले आहेत. सहायक आयुक्त रमाकांत माने यांच्या मार्गदर्शनाखाली शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विक्रम गौड, सहायक निरीक्षक भोलेनाथ अहिवळे, गणपत वाळकोळी, अविनाश भिवरे, बशीर सय्यद, रणजीत फडतरे, प्रवीण राजपूत आदींनी ही कारवाई केली.