पुणे : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्थापनेला १०० वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर पुणे महानगरात संघ शक्तीचे विराट दर्शन घडविण्याचे नियोजन करण्यात आले आहे. महानगरातील स्वयंसेवकांनी विजयादशमी उत्सवानिमित्त भव्य कार्यक्रमांची योजना आखली आहे.

महानगरातील ९ भागांमध्ये एकूण ८४ शस्त्रपूजन उत्सव आयोजित करण्यात आले आहेत. संघ स्वयंसेवकांची एकूण ७७ सघोष पथ संचलने शहराच्या विविध भागांतून आयोजित करण्यात येणार आहेत. या उत्सवांमध्ये बाल वयोगटातील स्वयंसेवकही मोठ्या प्रमाणावर सहभागी होणार असून त्यांच्यासाठी २० संचलने आणि २७ शस्त्रपूजन कार्यक्रमांचाही समावेश आहे. बाल गटाचे उत्सव आठवडाभरात असतील.

यंदा संघाने पथसंचलनासोबतच शस्त्रपूजन उत्सवांवर अधिक भर दिला आहे. समाजातील विविध क्षेत्रांतील मान्यवरांना या उत्सवांमध्ये प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित करण्यात आले आहे.

पंच परिवर्तन अभियान

शताब्दी वर्षादरम्यान संघ ‘पंच परिवर्तन अभियान’ राबविण्यात येणार आहे. त्यामध्ये पर्यावरण संरक्षण, सामाजिक समरसता, स्व-आधारित व्यवस्था, कुटुंब प्रबोधन आणि नागरिक कर्तव्य यावर आधारित अभियान असेल. तसेच, देशभरातील प्रत्येक मंडळ आणि वस्तीपर्यंत पोहोचून सध्याच्या ६८ हजारांहून अधिक असलेल्या शाखांची संख्या एक लाखापर्यंत वाढवण्याचे संघाचे उद्दिष्ट आहे. प्रत्येक गावात संघ स्वयंसेवक गृह संवाद अभियान राबवून राष्ट्रीय विचार आणि संघाची भूमिका पोहचविण्याचा प्रयत्न करणार आहे. सामाजिक समरसतेसाठी सर्व मंडळे आणि वस्त्यांमध्ये हिंदू संमेलने आयोजित केली जाणार आहेत.