पुणे : रिक्षा, कॅब अथवा खासगी बसने भाडे नाकारले, जादा भाडे घेतले, अशा प्रवाशांच्या तक्रारींचे निवारण जलद करण्यासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालयाने (आरटीओ) व्हॉट्सॲप हेल्पलाइन क्रमांक सुरू केला. प्रत्यक्षात या क्रमांकावर तक्रारींऐवजी शुभेच्छा संदेशांचा पाऊस पडू लागला आहे. शंभर संदेशांपैकी केवळ एखादा संदेश तक्रारीचा असल्याचा अनुभव सध्या आरटीओत येत आहे. त्यातही बहुतेक तक्रारी रिक्षाबद्दल आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

शहरात रिक्षाचालक भाडे नाकारत असल्याच्या तक्रारी प्रवासी नेहमी करतात. याचबरोबर अनेक रिक्षाचालक जवळच्या अंतराचे भाडे नाकारतात अथवा त्यासाठी भाड्यापेक्षा जास्त पैसे मागतात. अनेक जण मीटरने जाण्याऐवजी अव्वाच्या सव्वा रक्कम सांगून प्रवाशांची लूट करतात. याचबरोबर कॅबचालक आणि खासगी बसचालकांबद्दलही प्रवाशांच्या अशाच प्रकारच्या तक्रारी आहेत. मात्र, तक्रार करावयाची झाल्यास ती कशी करावयाची हा मूळ प्रश्न प्रवाशांसमोर उभा राहतो. लेखी तक्रार देण्यासाठी आरटीओमध्ये जाण्यात त्यांना वेळ घालवावा लागतो. त्यामुळे प्रवाशांना सहजपणे तक्रार करता यावी, यासाठी आरटीओने व्हॉट्सॲप हेल्पलाइन क्रमांक ८२७५३३०१०१ सुरू केला आहे.

हेही वाचा : उद्धव ठाकरे हे औरंगजेब फॅन क्लबचे नेते… अमित शाहांची टीका

नियमभंग करणाऱ्या वाहनचालकांची तक्रार या क्रमाकांवर केल्यानंतर आरटीओचे अधिकारी तक्रारीची शहानिशा करतात. दोषी वाहनचालकांवर कारवाई केली जाते. प्रत्यक्षात या हेल्पलाइन क्रमांकावर सध्या शुभेच्छा संदेशच जास्त प्रमाणात येत आहेत. अनेक जण आरटीओच्या हेल्पलाइनचे कौतुक करीत आहे. या हेल्पलाइनवर दिवसाला सध्या ३०० ते ३५० संदेश येतात. त्यांपैकी केवळ १ ते २ संदेश तक्रारींचे असतात. त्यामुळे या हेल्पलाइनवरच आरटीओकडून तक्रारींसाठी हा क्रमांक असल्याचा खुलासा करावा लागत आहे. हे करताना कर्मचाऱ्यांची दमछाक होत आहे.

तक्रारीसाठी व्हॉट्सॲप क्रमांक

८२७५३३०१०१

अशाही तक्रारी…

आमच्या भागात वाहतूककोंडी झाली आहे, या ठिकाणी सिग्नल बसवावा, माझ्या दुकानासमोर कोणी तरी वाहन उभे केले आहे. अशा प्रकारच्या वाहतूक पोलिसांशी निगडित तक्रारी आरटीओच्या हेल्पलाइनवर येत आहेत. त्यावर आरटीओतील कर्मचारी नागरिकांना संबंधित विभागाकडे तक्रार करण्यास सुचवत आहेत. याचबरोबर मुंबईसह राज्यातील इतर ठिकाणांहूनही नागरिक तक्रार करीत आहेत. त्यावर ही हेल्पलाइन केवळ पुणे आरटीओसाठी असल्याचा खुलासा कर्मचाऱ्यांना करावा लागत आहे.

हेही वाचा : शरद पवार हे भारतीय राजकारणातील भ्रष्टाचाराचे म्होरके, अमित शाहांची बोचरी टीका

हेल्पलाइनवरील तक्रारी

एकूण तक्रारी – २९

उद्धटपणे वागणे – १६
भाडे नाकारणे – १७

जादा भाडे आकारणी – १०
जलद मीटर – २

रिक्षाचालकांना नोटीस – २७

हेही वाचा : शरद पवारांचा अपमान मी केला नाही, करणार पण नाही, ते माझं दैवत – अजित पवार

अशी होते कारवाई

  • प्रवाशाने तक्रार केल्यानंतर त्याची खातरजमा
  • तक्रारीच्या अनुषंगाने वाहनमालकाला नोटीस
  • वाहनमालकाचे म्हणणे ऐकून तक्रारीचा निपटारा
  • वाहनमालकाने नोटिशीला उत्तर न दिल्यास दुसरी नोटीस
  • दुसऱ्या नोटिशीला उत्तर न दिल्यास थेट कारवाई
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pune rto started helpline for complaints regarding auto rickshaw and private bus drivers pune print news stj 05 css