पुणे : बी. जे. वैद्यकीय महाविद्यालय तथा ससून सर्वोपचार रुग्णालयात पहिली रोबोटिक शस्त्रक्रिया यशस्वीपणे करण्यात आली. एका ३५ वर्षीय महिलेच्या पित्ताशयाची पिशवी या शस्त्रक्रियेद्वारे काढून टाकण्यात आली. खासगी रुग्णालयात लाखो रुपयांचा खर्च होणारी ही प्रक्रिया ससून रुग्णालयात मोफत करण्यात आली. यामुळे गरीब आणि गरजू रुग्णांना अत्याधुनिक उपचारांचा मार्ग उपलब्ध झाला आहे.

ससूनमध्ये शस्त्रक्रिया विभागाचे नूतनीकरण नुकतेच करण्यात आले. त्यात हा विभाग पूर्णपणे अद्ययावत करण्यात आला असून, रोबोटिक शस्त्रक्रियेची यंत्रणाही बसविण्यात आली. रुग्णालयात ३५ वर्षीय महिला पोटदुखीच्या तक्रारीसह दाखल झाली. डॉक्टरांनी केलेल्या तपासणीत तिच्या पोटात पित्ताचे खडे असल्याचे निदान झाले. त्यावेळी तिच्यावर रोबोटिक प्रणालीद्वारे शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेण्यात आला. या महिलेवर ही शस्त्रक्रिया यशस्वीपणे करण्यात आली. रोबोटिक शस्त्रक्रियेची सुविधा सुरू करणारे ससून हे पश्चिम महाराष्ट्रातील एकमेव सरकारी रुग्णालय आहे.

रोबोटिक शस्त्रक्रियेसाठी मागील काही महिन्यांपासून ससूनमधील डॉक्टर आणि परिचारिकांना विशेष प्रशिक्षण देण्यात आले आहे. प्रशिक्षणासाठी सिम्युलेटरचा वापर करण्यात आला. ही शस्त्रक्रिया डॉ. लता भोईर, डॉ. आशिष चव्हाण, डॉ. सागर कुर्कुरे व डॉ. पूनिमा अग्रवाल यांच्या शल्यचिकित्सक पथकाने केली.

भूलतज्ज्ञ पथकामध्ये डॉ. सुरेखा शिंदे, डॉ. नेहा कांबळे, डॉ. सुजित क्षीरसागर व डॉ. अनुजा यांचा समावेश होता. शस्त्रक्रियेसाठी परिचारिका राजश्री कानडे, उज्वला गरुड, शमा बांदिसोडे आणि साधना धोमसे यांनी मदत केली.

याबाबत शल्यचिकित्साशस्त्र विभागाच्या प्रमुख डॉ. लता भोईर म्हणाल्या की, या महिलेला ५ ते ६ महिन्यांपासून पोटदुखीचा त्रास होता. तिच्या तपासणीत पोटात पित्ताचे खडे असल्याचे निदान झाले. रोबोटिक शस्त्रक्रियेद्वारे तिची पित्ताशयाची पिशवी काढून टाकण्यात आली. रोबोटिक प्रक्रियेमुळे अगदी छोटा छेद देण्याची गरज भासली. यामुळे कमी रक्तस्राव झाला आणि रुग्ण लवकर बरा होण्यास मदत झाली आहे. रोबोटिक तंत्रज्ञान हे कर्करोग आणि हर्नियासारख्या पोटातील विकारांवर अचूकपणे शस्त्रक्रिया करण्यास मदत करते.

रोबोटिक शस्त्रक्रियेचे फायदे

  • अत्यंत अचूकता
  • कमी वेदना
  • रुग्ण लवकर बरा
  • लवकर रुग्णालयातून घरी
  • गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया अधिक सुरक्षित

खासगी रुग्णालयात रोबोटिक शस्त्रक्रियेसाठी ३ ते ५ लाख रुपये खर्च येतो. ससून रुग्णालयात ही सुविधा गरजू रुग्णांसाठी मोफत उपलब्ध करून देण्यात आली आहे. ससून रुग्णालय गरजू रुग्णांसाठी नेहमीच आणि अत्याधुनिक आणि उत्तम सुविधा देण्यासाठी कटिबद्ध आहे. – डॉ. एकनाथ पवार, अधिष्ठाता, ससून रुग्णालय.