पुणे : डंपरच्या चाकाखाली सापडून दुचाकीवरील सहप्रवासी शाळकरी मुलाचा मृत्यू झाल्याची घटना खराडी भागात घडली. याप्रकरणी डंपरचालकाला खराडी पोलिसांनी अटक केली.अंशुमन अनुपमकुमार गायकवाड (वय ११, रा. केशवननगर, मुंढवा) असे मृत्युमुखी पडलेल्या मुलाचे नाव आहे. याप्रकरणी डंपरचालक राजाराम दयाराम राठोड (वय ४८, रा. वडगाव शेरी) याला अटक करण्यात दिली. याबाबत तन्मयी अनुपकुमार गायकवाड (वय २३) हिने खराडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खराडी भागात अंशुमन शिकवणीला जायचा. शनिवारी दुपारी दुचाकीस्वार तन्मयी ही अंशुमनला शिकवणीला सोडण्यासाठी निघाली होती. खराडीतील झेन्सार कंपनीच्या मैदानासमोर गतीरोधक न दिसल्याने डंपरचालकाने अचानक ब्रेक दाबला. पाठीमागून येत असलेल्या दुचाकीस्वार तन्मयीचे नियंत्रण सुटले. डंपरवर आदळून दुचाकीस्वार तन्मयी आणि अंशुमन हे जखमी झाले. डंपरच्या चाकाखाली सापडल्याने अंशुमनचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर डंपरचालक राठोड याला अटक करण्यात आल्याची माहिती खराडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय चव्हाण यांनी दिली.