पुणे : शिवाजीनगर पोलीस वसाहतीतील २२ मजली इमारतीत गेले दोन दिवस पाणीपुरवठा झाला नाही. वीजबिलाच्या भरण्याअभावी पाणीपुरवठा खंडित झाल्याने पोलीस कुटुंबीय बेहाल झाले आहे. वीजबिल तातडीने भरण्याची मागणी पोलीस कुटुंबीयांनी केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

शिवाजीनगर पोलीस मुख्यालयात बैठ्या चाळींच्या जागी २२ मजली दोन इमारती चार वर्षांपूर्वी बांधण्यात आल्या. राजगड आणि शिवनेरी असे इमारतींचे नामकरण करण्यात आले. राज्यात पहिल्यांदाच पोलीस वसाहतीत गगनचुंबी इमारती बांधण्यात आल्या होत्या. हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प मार्गी लावण्यासाठी तत्कालीन पोलीस आयुक्त के. वेंकटेशम यांनी पाठपुरावा केला होता. २२ मजली इमारतीत पाणीपुरवठा, लिफ्ट, तसेच वापरातील जागेत बसविलेल्या दिव्यांसाठी (काॅमन स्पेस) तीन वीज मीटर बसविण्यात आले आहेत. या तीन मीटरचे बिल शासनाकडून जमा करण्यात येते. पोलीस आयुक्त कार्यालयामार्फत हे बिल महावितरणला अदा करण्यात येते.

शासनाने एप्रिल २०२४ पासून बिलाचे पैसे पोलीस आयुक्त कार्यालयात जमा न केल्याने पाणीपुरवठा करणाऱ्या मीटरवर कारवाई करून महावितरणने वीजपुरवठा खंडित केला आहे. गेल्या दोन दिवसांपासून गगनचुंबी इमारतीत पाणीपुरवठा न झाल्याने रहिवासी विशेषत: महिलांना त्रासाला सामोरे जावे लागत आहे. दैनंदिन वापरातील पाणी तळमजल्यावरून आणावे लागत असल्याने पोलीस कर्मचारी आणि त्यांचे कुटुंबीय मेटाकुटीला आले आहेत. पोलीस कर्मचारी २४ तास काम करतात. शासनाच्या अनास्थेमुळे गगनचुंबी पोलीस वसाहतीतील पोलीस कुटुंबीय बेहाल झाले आहेत, अशी माहिती शिवाजीनगर पोलीस वसाहतीतील नागरिकांनी दिली.

२२ मजल्यावर जायचे कसे?

पाणीपुरवठा करणाऱ्या पंपांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. येत्या दोन दिवसात लिफ्टचा वीजपुरवठा खंडित केला जाणार आहे. लिफ्ट बंद पडली तर, गगनचुंबी इमारतीत रहिवासी जाणार कसे? असा सवाल रहिवाशांनी उपस्थित केला आहे.

शिवाजीनगर पोलीस वसाहतीतील इमारतीत तीन मीटर आहेत. लिफ्ट, पाणीपुरवठ्यासाठी वेगळा मीटर आहेत. पाणी पुरवठ्यासाठी जोडलेल्या मीटरचे बील ३४ लाख रुपये आले आहे. त्यापैकी १७ लाख रुपये पोलीस आयुक्त कार्यालयाने अदा केले आहेत. उर्वरित बिलाचे पैसे शासन जमा करणार आहे. लवकरच हा प्रश्न मार्गी लागेल. – संदीप भाजीभाकरे, पोलीस उपायुक्त, शिवाजीनगर पोलीस मुख्यालय

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pune shivajinagar police building water supply electricity bill pune print news ssb