पुणे : भरधाव टेम्पाेच्या धडकेत दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना पुणे-सोलापूर रस्त्यावरील लोणी काळभोर भागात घडली. याप्रकरणी टेम्पोचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
सुरेश विठ्ठल कांबळे (वय ३३, रा. पांढरे मळा, कदमवाक वस्ती, लोणी काळभोर, पुणे-सोलापूर रस्ता) असे मृत्युमुखी पडलेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. याप्रकरणी टेम्पाेचालक एकनाथ नवनाथ चोरमोले (वय २३, रा. खामगाव, ता. दौंड, जि. पुणे) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत विठ्ठल लक्ष्मण कांबळे (वय ३३) यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दुचाकीस्वार सुरेश बुधवारी (४ जून) रात्री कामावर निघाले होते. त्या वेळी पुणे-सोलापूर रस्त्यावर कदमवाक वस्ती परिसरात भरधाव टेम्पोने दुचाकीस्वार सुरेश यांना धडक दिली. अपघातात गंभीर जखमी झालेले सुरेश यांचा उपचारांपूर्वीच मृत्यू झाला होता. अपघातानंतर पसार झालेल्या टेम्पाेचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस उपनिरीक्षक सोनटक्के तपास करत आहेत.