पुणे : स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्याविषयी वक्तव्य करताना काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आधार घेतलेल्या पुस्तकाची त्यांनी प्रत न्यायालयात सादर करण्याच्या सात्यकी सावरकर यांच्या अर्जावर म्हणणे मांडण्यासाठी मुदत मागितली आहे. त्यावर पुण्याच्या विशेष न्यायालयाने राहुल गांधी यांना ३ जुलैपर्यंत आपले म्हणणे मांडण्यासाठी मुदत दिली आहे.

विशेष न्यायाधीश अमोल शिंदे यांनी हा आदेश दिला. या प्रकरणी राहुल गांधी यांच्या विरोधात सात्यकी सावरकर यांनी मानहानीची फौजदारी याचिका दाखल केली आहे. ब्रिटन दौऱ्यात राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी बदनामीकारक वक्तव्य केल्याचा आरोप सात्यकी सावरकर यांनी केला आहे. हे वक्तव्य करताना त्यांनी दाखला दिलेले पुस्तक न्यायालयात सादर करण्याची मागणी सात्यकी सावरकर यांचे वकील ॲड. संग्राम कोल्हटकर यांनी केली आहे. त्यावर राहुल गांधी यांचे वकील ॲड. मिलिंद पवार यांनी मुदतवाढ मागितली.

लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे घटनात्मक पदावर असून, ते अत्यंत महत्त्वाच्या शासकीय कर्तव्ये आणि सार्वजनिक जबाबदाऱ्यांमध्ये व्यग्र आहेत. काही अपरिहार्य आणि अनपेक्षित परिस्थितीमुळे तक्रारदारांच्या अर्जावर म्हणणे दाखल करण्यास असमर्थ आहेत. तक्रारदारांनी पुस्तकाची प्रत मागण्यासाठी भारतीय नागरिक सुरक्षा संहितेच्या कलम ९३ चा चुकीचा वापर केला असून, हा दावा सुरू झाला तेव्हा या संहितेची अंमलबजावणी झाली नव्हती. त्यामुळे तक्रारदारांनी न्यायालयाची दिशाभूल केली आहे, असे दावे राहुल गांधी यांच्या वकिलांनी केले. दरम्यान, राहुल गांधी हे वेळकाढूपणा करत असल्याचे सात्यकी सावरकर यांच्या वकिलांनी म्हटले आहे. या प्रकरणी ३ जुलै रोजी सुनावणी होणार आहे.