पुणे : टिळक रस्त्यावरील विसर्जन मिरवणूक लवकर संपविण्याचा निर्णय शुक्रवारी झालेल्या ‘टिळक रस्ता गणेशोत्सव विसर्जन मिरवणूक समिती’च्या बैठकीत घेण्यात आला आहे. टिळक रस्ता गणेशोत्सव विसर्जन मिरवणूक समितीच्या पदाधिकाऱ्यांसह विविध मंडळांच्या कार्यकर्त्यांनी शुक्रवारी विसर्जन मिरवणूक मार्गाची पाहणी केली.

परिमंडळ दोनचे पोलीस उपायुक्त मिलिंद मोहिते, स्वारगेट पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक यशवंत निकम, खडक पोलीस ठाण्याच्या गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षक शर्मिला सुतार, विश्रामबाग पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष पांढरे, तसेच साने गुरुजी तरुण मंडळाचे अध्यक्ष धीरज घाटे, सेवा मित्र मंडळाचे अध्यक्ष शिरीष मोहिते, नेहरू तरुण मंडळाचे पुष्कर तुळजापूरकर, दर्शन मित्र मंडळाचे गणेश घोष, सत्यवीर मित्र मंडळाचे उमेश वैद्य, सुभाषनगर माडीवाले कॉलनी मित्र मंडळाचे विनायक धारणे, एकता मित्र मंडळाचे सुरेश ढमाले, शिवदर्शन मित्र मंडळाचे अमित बागुल, अचानक मित्र मंडळाचे ऋषिकेश भुजबळ आदी उपस्थित होते.

‘टिळक रस्त्यावरील विसर्जन मिरवणुकीत यंदा एक ते दोन पथकांना सहभागी होण्यास परवानगी देण्यात आली आहे. विसर्जनाच्या दिवशी या रस्त्यावर विविध खाद्यपदार्थ विक्रेत्यांकडून गाड्या लावण्यात येतात. खाद्यपदार्थ विक्रेत्यांनी अंतर्गत रस्त्यावर व्यवसाय करावेत. करण्यात येणार आहे. यंदा विसर्जन मिरवणूक रात्री बारापूर्वी संपविण्यााच्या दृष्टीने प्रयत्न करण्यात येणार आहेत,’ असे बैठकीनंतर सांगण्यात आले.

स्वारगेट येथील देशभक्त केशवराव जेधे चौकातून सहभागी होणाऱ्या मंडळांनी पाच तासांत, तसेच पूरम चौकातून सहभागी होणाऱ्या मंडळांनी चार तासांत मिरवणूक संपवावी, या दृष्टीने प्रयत्न करण्यात येणार आहे. या दोन्ही चौकांतून २०६ मंडळे विसर्जन मिरवणुकीत सहभागी होतात. विसर्जन मार्गावरील दोन्ही प्रमुख चौकांत गर्दी असते. त्यामुळे मंडळांना मुख्य मिरवणूक मार्गावर सहभागी होताना विलंब होतो. विसर्जन मिरवणूक लवकर संपविण्याच्या दृष्टीने पोलिसांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला आहे. लक्ष्मी रस्त्यानंतर टिळक रस्त्यावरील विसर्जन मिरवणुकीत सार्वजनिक मंडळे सहभागी होतात.

जेधे, पूरम चौकात ध्वनिवर्धक, वादनास मनाई

टिळक रस्त्यावरील जेधे चौक, पूरम चौकात गर्दी असते. या दाेन्ही चौकांतून मंडळे विसर्जन मार्गावर सहभागी होतात. या चौकांत मंडळांना थांबावे लागते. त्यामुळे यंदा या दोन्ही चौकांत ढोल-ताशा पथकांचे वादन आणि ध्वनिवर्धकांचा वापर करण्यास मनाई करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.