पुणे : गणेशखिंड रस्त्यावरील टाटा मेट्रो स्थानकाचे काम सुरू करण्यात आले. मेट्रो स्थानकाच्या कामासाठी (गर्डर लाॅचिंग) वेधशाळा चौक परिसरात शनिवारपासून (४ एप्रिल) वाहतूक बदल करण्यात येणार आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शिवाजीनगर-हिंजवडी मेट्रो मार्गिकेवरील वेधशाळा चौक परिसरात टाटा मेट्रो स्थानकाचे काम सुरू करण्यात आले आहे. शिवाजीनगर स्थानक, वीर चापेकर चौक, वेधशाळा चौकातील वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी या भागात शनिवारपासून वाहतूक बदल करण्यात येणार आहे. हे काम पूर्ण होईपर्यंत या भागातील वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आले आहेत. गणेशखिंड रस्त्यावरील वीर चापेकर चौक ते नरवीर तानाजी वाडी परिसरातील के. बी. जोशी मार्ग ते वेधशाळा चाैक (एसटी स्थानक मार्ग) मार्ग एकेरी करण्यात येणार आहे. वीर चापेकर उड्डाणपुलावरुन वेधशाळेकडे जाणाऱ्या वाहनांना प्रवेश बंद करण्यात येणार आहे. वाहनचालकांनी चापेकर उड्डाणपुलाच्या डाव्या बाजूकडील सेवा रस्त्याने चापेकर चौक, डावीकडे वळून नरवीर तानाजीवाडी, उजवीकडे वळून वेधशाळा चौकाकडे जावे, असे आवाहन वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त रोहिदास पवार यांनी केले आहे.

हेही वाचा – ‘सीए’ अभ्यासक्रमाच्या परीक्षांबाबत झाला महत्त्वाचा बदल… किती वेळा होणार परीक्षा?

फर्ग्युसन महाविद्यालय रस्त्यावरुन वीर चापेकर चौकातून वेधशाळा चौकाकडे वळण्यास मनाई करण्यात आली आहे. वाहनचालकांनी वीर चापेकर चौकमार्गे, नरवीर तानाजीवाडी, उजवीकडे वळून वेधशाळा चौकाकडे जावे. नरवीर तानाजीवाडी चौक ते चापेकर चैाक दरम्यानची वाहतूक बंद राहणार आहे. वाहनचालकांनी नरवीर तानाजीवाडी चौकातून डावीकडे वळून वेधशाळा चौकातून उजवीकडे वळून चापेकर चौकाकडे जावे, अशी माहिती देण्यात आली.

हेही वाचा – पुणे : बेकायदा मद्य विक्री करणाऱ्या ढाबाचालकाला एक लाखांचा दंड

जंगली महाराज रस्त्यावरील स. गो. बर्वे (माॅडर्न कॅफे चौक) चौकातून शिवाजीनगर रेल्वे स्थानकाकडे जाणाऱ्या वाहनांना प्रवेश बंद करण्यात येणार आहे. वाहनचालकांनी वेधशाळा चौकमार्गे डावीकडे वळून वीर चापेकर चौक, उजवीकडे वळून नरवीर तानाजीवाडीमार्गे शिवाजीनगर रेल्वे स्थानकाकडे जावे. शिवाजीनगर रेल्वे स्थानकाकडून एसटी स्थानक चौकातून नरवीर तानाजीवाडीकडे जाणाऱ्या वाहनांना प्रवेश बंद राहणार आहे. वेधशाळा चौकातून गणेशखिंड रस्तामार्गे विद्यापीठाकडे जाणाऱ्या वाहनांनी एलआयसी कार्यालयाकडील बाजूने वळून वीर चापेकर उड्डाणपुलाकडे जावे. वीर चापेकर ते नरवीर तानाजीवाडी चौक ते वेधशाळा चौक परिसरात सर्व प्रकारची वाहने लावण्यास मनाई करण्यात आल्याचे सांगण्यात आले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pune traffic diversion at vedhashala chowk for metro station work pune print news rbk 25 ssb