पुणे : सनदी लेखापाल (सीए) अभ्यासक्रमाच्या परीक्षांबाबत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार फाऊंडेशन आणि इंटरमिजिएट स्तराची परीक्षा उत्तीर्ण होण्याची उमेदवारांना आणखी एक संधी मिळणार आहे. या अभ्यासक्रमातील इंटरमिजिएट आणि फाऊंडेशन परीक्षा वर्षातून तीनवेळा घेण्याचा निर्णय घेतला आहे. मे-जून, सप्टेंबर आणि जानेवारीमध्ये या परीक्षा घेतल्या जाणार आहेत.
इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडियाच्या (आयसीएआय) अभ्यास मंडळाने घेतलेल्या निर्णयाची माहिती आयसीएआयने संकेतस्थळावर जाहीर केली आहे. गेल्या वर्षीपर्यंत इंटरमिजिएट, फाऊंडेशन आणि अंतिम या तीनही परीक्षा वर्षातून दोनवेळा घेतल्या जात होत्या. मात्र, आता अंतिम परीक्षा मे आणि नोव्हेंबर अशी वर्षातून दोनवेळा घेतली जाणार आहे. तर फाऊंडेशन आणि इंटरमिजिएट परीक्षा वर्षातून तीनवेळा घेतली जाणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना अतिरिक्त संधी प्राप्त होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
हेही वाचा – पुणे : बेकायदा मद्य विक्री करणाऱ्या ढाबाचालकाला एक लाखांचा दंड
हेही वाचा – पुणे : गांजा विक्री प्रकरणात अटक केलेली महिला पोलीस ठाण्यातून पसार
या शिवाय १ जानेवारी २०२४ पर्यंत फाऊंडेशन किंवा थेट इंटरमिजिएट परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांना सप्टेंबर २०२४ मध्ये इंटरमिजिएट परीक्षेत देण्यासाठी पात्र असल्याचेही नमूद करण्यात आले आहे.