पुणे : शहरातील रस्त्यांवर, चौकांमध्ये होत असलेल्या वाहतूक कोंडीतून नागरिकांची सुटका करण्यासाठी महापालिका आयुक्तांनी पुढाकार घेतला आहे. ‘ज्या ३२ रस्त्यांवर आणि चौकांमध्ये वाहतुकीची सतत कोंडी होते, अशा २२ ठिकाणांची पाहणी करून त्याचा अहवाल सोमवारपर्यंत द्यावा,’ अशा सूचना आयुक्त नवल किशोर राम यांनी दिल्या आहेत.
शहरात होत असलेल्या वाहतूक कोंडीमुळे नागरिकांसह वाहनचालक त्रस्त झाले आहेत. शहराच्या एका भागातून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी मोठा वेळ लागतो. शहरात अनेक रस्त्यांवर वाहनांच्या रांगा लागतात. यामधून नागरिकांना दिलासा मिळावा, यासाठी आयुक्त राम यांनी लक्ष देण्यास सुरुवात केली आहे. शहरातील प्रमुख ३२ रस्ते आणि वाहतूक कोंडी होणाऱ्या २२ ठिकाणांची प्रत्यक्ष पाहणी करून तेथे नक्की कोंडी का होते, याचा सविस्तर अहवाल देण्याचे आदेश आयुक्तांनी पथ विभाागाच्या अधिकाऱ्यांना दिले आहेत.
वाहतूक कोंडीत पुणे शहराचा जगात पहिल्या १० शहरांमध्ये क्रमांक लागतो. यामुळे अनेक परदेशी कंपन्या पुण्याबाहेर जाण्याच्या प्रयत्नात आहेत. हिंजवडी येथे जाण्यासाठी आयटी कंपनीच्या कर्मचाऱ्यांना तासनतास वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. वाहतुकीचा कमी झालेला वेग वाढविण्यासाठी गेल्या काही महिन्यांपासून महापालिका, वाहतूक पोलिसांनी प्रयत्न सुरू केले आहेत. मात्र, अजूनही ही समस्या कायम आहे. त्यामुळे एक पाऊल पुढे टाकून पथ विभाागातील अधिकाऱ्यांची आयुक्तांनी बैठक घेतली. तसेच, या ठिकाणांची पाहणी करून अहवाल सादर करण्यास सांगितले आहे.
रस्त्यावर पडलेले खड्डे दुरुस्त करताना महापालिका अनेकदा चुकीच्या पद्धतीने खड्डे बुजविते त्यामुळे काम केल्यानंतरदेखील अनेकदा रस्त्यांवर खड्डे कायम राहतात. त्यामुळेही वाहतुकीचा वेग कमी होत असल्याचे समोर आले आहे. तर, काही ठिकाणी रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात झालेल्या अतिक्रमणांमुळे रस्ते अरुंद झाले आहेत. त्याचाही परिणाम वाहतुकीच्या वेगावर होतो. या पार्श्वभूमीवर आयुक्तांनी कोंडीची कारणे शोधण्यास सांगितली आहे.
शहरातील अनेक रस्त्यांवर वाहतुकीची कोंडी होते. गेल्या तीन-चार दिवसांपासून शहरात पडत असलेल्या पावसामुळे अनेक रस्त्यांवर पाणी साठवून राहत असून त्याचा निचरा होण्यासाठी विलंब होत असल्याचे समोर आले आहे. साठलेल्या पाण्यातून वाहने चालवताना वाहन चालकांचे तसेच रस्त्याने चालणाऱ्या नागरिकांची तारांबळ उडते. आयुक्तांनी दिलेल्या आदेशांमुळे तयार केल्या जाणाऱ्या अहवालामध्ये याचा उल्लेख करण्यात येणार की नाही, हे अहवाल आल्यानंतरच स्पष्ट होणार आहे.
हे अधिकारी करणार पाहणी
या पाहणीमध्ये पथ विभाग, बांधकाम विभाग, क्षेत्रीय कार्यालय, परिमंडळ कार्यालय, अतिक्रमण विभाग, विद्युत विभाग, आकाशचिन्ह या विभागांमधील अधिकारी, अभियंत्यांचा समावेश आहे. हे अधिकारी प्रत्यक्ष जागेवर जाऊन ही पाहणी करणार आहेत. त्याचा अहवाल सोमवारपर्यंत सादर करण्यास सांगितले आहे.