पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वसतिगृहात गांजा सापडल्याचे उघडकीस आले आहे. या प्रकरणी विद्यापीठाकडून दोन विद्यार्थ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे विद्यापीठाच्या वसतिगृह आणि सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
विद्यापीठाच्या वसतिगृह क्रमांक पाचमधील एका खोलीत विद्यार्थी गांजा ओढत असल्याची तक्रार एका विद्यार्थ्याने सुरक्षा विभागाकडे केली. त्यानुसार सुरक्षा विभागातील कर्मचाऱ्यांनी प्रत्यक्ष जाऊन घटनेची पाहणी केली. विद्यार्थ्याने केलेल्या तक्रारीनुसार सुरक्षा विभागाने तक्रारदार विद्यार्थी आणि गांजा ओढत असलेल्या दोन विद्यार्थ्यांना पोलिसांच्या ताब्यात दिले. त्यानंतर विद्यापीठ प्रशासनाकडून चतु:शृंगी पोलीस ठाण्यात दोन विद्यार्थ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा – अजित पवार उपमुख्यमंत्री झाल्यानंतर बारामतीमध्ये जल्लोष
u
विद्यापीठाच्या कुलसचिव डॉ. ज्योती भाकरे म्हणाल्या, की वसतिगृहाचे गृहपाल यांच्याकडून संबंधित प्रकरण पोलिसांकडे दाखल करण्यात आले. पुढील कार्यवाही पोलिसांकडून करण्यात येत आहे. संबंधित विद्यार्थी विद्यापीठाच्या वसतिगृहामध्ये प्रवेशित नाही.
तीन महिन्यांत दुसरी घटना
विद्यापीठाच्या वसतिगृहात गांजा सापडण्याची ही दुसरी वेळ आहे. तीन महिन्यांपूर्वीही असाच प्रकार उघडकीस आला होता. त्यानंतर विविध राजकीय पक्ष, संघटनांकडून विद्यापीठात आंदोलने करण्यात आली होती.
© The Indian Express (P) Ltd