पुणे : रस्त्यांच्या दोन्ही बाजूंना लावले जाणारे बेकायदा जाहिरात फलक, सणासुदीला वाढत असलेली फ्लेक्सची संख्या, अनधिकृत जाहिरात फलकांबाबत वारंवार तक्रारी करून देखील महापालिकेकडून केले जाणारे दुर्लक्ष या सर्व गोष्टींच्या पार्श्वभूमीवर विमाननगर भागातील नागरिकांचा संयम अखेर सुटला.

या भागातील रहिवाशांनी एकत्रित येऊन स्वयंस्फूर्तीने फ्लेक्स काढण्याची मोहीम राबविली. भरपावसात स्थानिक नागरिकांनी एकत्र जमत या परिसरातील बेकायदा जाहिरात फलक काढून टाकले. केवळ एका तासात या भागातील सुमारे ४० ते ५० फ्लेक्स काढून टाकून फ्लेक्सने भरलेले चौक रिकामे करण्यात आले.

‘नो मोअर फ्लेक्स, नो मोअर मेस!’ अशा घोषणा देत नागरिकांनी ही मोहीम राबवली. हॅशटॅग प्लेक्स फ्री विमाननगर या हॅशटॅगद्वारे त्यांनी याबाबत जनजागृती सुरू केली आहे. या भागात बेकायदा पद्धतीने लावण्यात आलेल्या जाहिरात फलकांमुळे विमाननगर परिसर बकाल झाला आहे. महापालिकेकडे वारंवार तक्रारी करूनही हे फ्लेक्स काढले जात नाहीत. त्यामुळे हा परिसर मोकळा करण्याच्या उद्देशाने विमाननगरमधील रहिवाशांनी स्वयंस्फूर्तीने फ्लेक्स काढण्याची मोहीम सुरू केल्याची माहिती नागरिकांनी दिली.

फ्लेक्स काढताना एक चिंताजनक गोष्ट समोर आली. ती म्हणजे, नवे फ्लेक्स जुन्या फ्लेक्सवरच चिकटवले गेले होते. त्यामुळे फ्लेक्सचे अनेक थर तयार झाले होते. मंदिरे, शाळा, बागा, दुकानांच्या पाट्या, नो पार्किंगचे फलक, अगदी विजेचे खांबसुद्धा या बेकायदा जाहिरात फलकांनी पूर्णपणे झाकले गेले होते. कोणतीही सार्वजनिक आणि सामुदायिक जागा फ्लेक्सच्या तावडीतून सुटली नव्हती. ही समस्या एखाद्या विषाणूसारखी पसरत आहे. तिच्यावर कोणताही ताबा नाही. वाहतुकीचे फलक असो वा दुकानांची नावे, कुठलाही भाग वाचलेला नाही, अशी तक्रार नागरिकांनी केली.

जे काम महापालिकेने करायला पाहिजे ते नागरिकांनी केले आहे. आता तरी महापालिकेने या विषयाकडे गांभीर्याने पाहून उर्वरित बेकायदा जाहिरात फलक तातडीने काढून घ्यावेत अशी, अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे. याबाबत महापालिकेच्या आकाशचिन्ह विभागाचे उपायुक्त संतोष वारुळे म्हणाले, शहरातील ज्या भागात अनधिकृत जाहिरात फलक लावण्यात आलेले आहेत. ते काढून टाकण्याच्या सूचना आकाशचिन्ह विभागातील कर्मचाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. विशेष मोहीम राबवून फ्लेक्स काढून टाकण्याचे नियोजन करण्यात आले आहे.